दिल्लीत ठरले, 10 दिवसात शेतकर्यांसाठी मोठा निर्णय
फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली/27 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ आज दिल्लीला गेलं आहे. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचं मंत्रिमंडळ दिल्लीत बैठकीसाठी गेलं. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदारी, कांदा उत्पादक शेतकरी आणि आंबा उत्पादक शेतकरी यांच्याबाबत काय-काय चर्चा झाली, केंद्र सरकारकडून काय मागण्या मागण्यात आल्या आणि केंद्र सरकारने काय मागण्या मान्य केल्या? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने पुढच्या 10 दिवसांत काही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, ते निर्णय नेमके काय आहेत ते फडणवीसांनी सांगितलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणींबाबत एक बैठक होती. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील उपस्थित होते. साखरेच्या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक सकारात्मक चर्चा झाली. विशेषत: आम्ही जे मुद्दे उपस्थित केले, एमएसपी वाढवावा, इथेनॉलचा कोठा वाढवावा, वेल प्राईज सिस्टीम तयार करण्याबाबत, लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याबाबत आणि इंटरेस्ट सबमेन्शनचे पैसे देणे या प्रत्येक गोष्टीत अथिशय सकारात्मक निर्णय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एमएसपी वाढवणं गरजेचं आहे हे त्यांनी मान्य केलं. इथेनॉलचा कोठा हा मोठ्या प्रमाणात वाढण्याकरता दोन महिन्यात या संदर्भात निर्णय करण्याचं त्यांनी मान्य केलं. इंटरेस्ट सबमेन्शनचे पैसे तात्काळ देण्याचं त्यांनी मान्य केलं. लोन रिस्ट्रक्चरिंगबाबत राज्य सरकारसोबत काम करुन प्रश्न मार्ग लावण्याचं आश्वासन दिलं. प्रायजिंग संदर्भात त्यांनी प्रस्ताव मागवला आहे. तो प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत. तो प्रस्ताव मान्य झाल्यास साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. या व्यतिरिक्तदेखील काही मुद्दे आमच्या सदस्यांनी मांडले. त्यावर एक निवेदन त्यांनी मागवले आहे. पुढच्या दहा दिवसांत निर्णय घेण्याचं अमित शाह यांनी मान्य केले आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.




