विदर्भासाठी संशोधन व नवोपक्रमाचे नवे पर्व; ‘व्हि जी राईज सेंटर’चे उद्घाटन

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत नव्या उपक्रमाला सुरुवात

अमरावती /18 फेब्रुवारी : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉ.पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन येथे उभारण्यात आलेल्या ‘व्हि जी राईज सेंटर’चा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला. संशोधन,नवोपक्रम, कौशल्य विकास व उद्योजकता यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे केंद्र विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी नवे पर्व ठरणार असल्याचे मत व्यक्त करून मान्यवरांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेत आता नव्या उपक्रमास सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे सांगितले. श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित स्व वसंतराव गुलालकरी राईज (ठखडए) सेंटरच्या उद्घाटन समारंभ छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून डॉ. माधव जी. लाभे, उद्घाटक म्हणून डॉ. यशवंत काटपातळ , विशेष अतिथी म्हणून समित सिंघई तसेच हरीश मोहोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले व कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. व्ही.जी. ठाकरे,स्वीकृत सदस्य डॉ. अमोल महल्ले, दानदाते प्रशांत गुलालकरी,प्राचार्य डॉ. जी. आर.गोसावी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून हेमंत काळमेघ यांनी सांगितले की, प्रत्यक्ष अनुभव, प्रकल्पाधारित शिक्षण व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे, हा या केंद्राचा मुख्य हेतू आहे.व्हि जी राईज म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन, स्किलिंग व एंटरप्रेन्युअरशिप. या चार स्तंभांवर आधारित एकात्मिक परिसंस्था येथे विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक व्हेईकल, स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर, स्मार्ट हेल्थकेअर आदी क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी सेंटरच्या माध्यमातून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन व नवोपक्रम प्रयोगशाळा, प्रोटोटाइप विकासासाठी स्वतंत्र सुविधा, स्टार्टअपसाठी को-वर्किंग स्पेस तसेच सेमिनार हॉल्स, मीटिंग रूम इ. अत्याधुनिक पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असणार आहे. विविध संस्थांमधील आंतरशाखीय संशोधन व उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सुमित सिंघई यांनी सांगितले.सेंटरबाबत बोलताना प्रशांत गुलालकारी यांनी सांगितले की, विदर्भातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या संधींसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने राईज सेंटरची संकल्पना मांडली. शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगारनिर्माते बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या वडिलांच्या वसंतराव गुलालकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे केंद्र सुरू केल्याचे सांगत त्यांनी मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि प्रादेशिक विकास यावर भर दिला.व्हि जी राईज सेंटरमुळे विदर्भात संशोधन संस्कृतीला चालना मिळेल, स्थानिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधले जातील. युवक, महिला व वंचित घटकांसाठी नवी संधी निर्माण होईल, अशी अपेक्षा डॉ.यशवंत काटपातळ यांनी व्यक्त केली. शासकीय उपक्रम, स्टार्टअप इंडिया व आत्मनिर्भर भारत यांसारख्या धोरणांना पूरक ठरणारे प्रकल्प येथे विकसित होणार असल्याचे हरीश मोहोड यांनी आपल्या भाषणातून सांगितले. ‘योग्य वातावरण व मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या कल्पना संशोधनात, स्टार्टअपमध्ये व सामाजिक परिवर्तनात रूपांतरित होऊ शकतात,’ असा विश्वास माधव लाभे यांनी यावेळी व्यक्त केला. व्हि जी राईज सेंटर डॉ. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक येथे सुरू झाल्यामुळे भविष्यात विदर्भाच्या शैक्षणिक व औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा हर्षवर्धन देशमुख यांनी यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.प्राचार्य डॉ जी.आर गोसावी यांनी स्वागत पर भाषण केले. संचालन प्रा.अभिजीत खोने,यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत ठाकरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थे चे आजीव सभासद विविध महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button