गाडगे नगरात सांडपाण्याची दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रशासनाचा निष्काळजीपणा अन् नागरिकांचा रोष

अमरावती/8 जून : अवेळी पडणार्‍या पावसामुळे गाडगे नगरातील गटारे तुंबली असून, सांडपाणी रस्त्यावर आणि थेट नागरिकांच्या घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, महानगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.
गाडगे नगरमधील प्रभाग क्रमांक 2 अंतर्गत येणार्‍या राठोड गल्ली क्रमांक 3 मध्ये पावसाच्या पाण्याने गटारे पूर्णपणे जाम झाली आहेत. ड्रेनेजचे दूषित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने लहान मुले व वृद्धांना ये-जा करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. सांडपाणी थेट घरांत शिरत असल्याने परिसरात कचर्‍याचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधले, मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि टाकाऊ वस्तू अडकून पाणी साचत असल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेकडून वरवरची स्वच्छता केली जाते, परंतु काढलेला गाळ वेळेवर न उचलल्यामुळे तो पुन्हा गटारातच जातो. परिणामी, थोड्याशा पावसानेही परिस्थिती पूर्वपदावर येते. दरवर्षी होणार्‍या या त्रासाने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जर एखादी मोठी आरोग्य समस्या उद्भवली, तर याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल गाडगे नगरमधील राठोड गल्लीचे रहिवासी उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तात्काळ सांडपाण्याचा निचरा करून स्वच्छतेची ठोस मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button