दोन गोदामांतील चोरीचा छडा लावण्यात यश

सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने आरोपीची ओळख

अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

अमरावती/10 नोव्हेंबर-  शहरातील मोरबाग परिसरात दोन गोदामांचे कुलूप तोडून झालेल्या चोरीचा छडा गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत लावला. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची रोख रक्कम, चांदीच्या रंगाची नाणी आणि इतर साहित्य असा एकूण 18 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरबाग परिसरातील जुम्मनशहा बाबा दर्ग्याजवळ असलेल्या 2 गोदामांमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरी केली होती. या घटनेची माहिती 10 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वड यांच्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गोदामांसह परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करण्यात आली. त्यातून संशयिताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, खत्री मार्केटमधील एका बंद दुकानाच्या मागे तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून परिसराला वेढा घातला आणि मुलाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता चोरीला गेलेला काही मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि चांदीच्या रंगाची नाणी यासह एकूण 18 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे दोन गोदामांतील चोरीचा तपास पुढे सरकला असून, या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

Back to top button