नोकराने व्यापार्‍याची दुचाकी पेटवली

वादाचा राग मनात धरून कृत्य केल्याचा संशय

अमरावती/10 नोव्हेंबर – दुकानात झालेल्या वादाचा राग मनात धरून एका कामगाराने आपल्याच मालकाची दुचाकी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. नदिम नामक कामगाराने कंवरनगर ते दस्तूरनगर मार्गावरील एका इमारतीच्या वाहनतळात उभी असलेली व्यापारी तलरेजा यांची दुचाकी पेटवली. या आगीत दुचाकीचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील छायाचित्रण यंत्रणेत कैद झाली आहे. दुचाकी पेटवल्यानंतर आरोपीने व्यापार्‍याला दूरध्वनी करून घटनेची माहिती देतानाच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा भेटण्याची धमकीही दिल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदिम हा व्यापारी तलरेजा यांच्या दुकानात कामाला होता. दुकानातील कामकाज सुरू असताना काही कारणावरून मालक आणि कामगार यांच्यात वाद झाला होता. या वादामुळे नदिमच्या मनात मालकाविषयी राग होता. त्याचाच बदला घेण्याच्या उद्देशाने सोमवारी, 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान तो कुंवरनगर ते दस्तूरनगर मार्गावरील इमारतीच्या वाहनतळात पोहोचला. तेथे उभी असलेल्या तलरेजा यांच्या दुचाकीवर त्याने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. काही वेळातच दुचाकीने पेट घेतला आणि ती आगीत जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे, दुचाकीला आग लावल्यानंतर नदिमने व्यापारी तलरेजा यांना दूरध्वनी केला. दुचाकी पेटविल्याचे सांगत त्यांना धमकीही दिली. तुरुंगात पाठविले तरी बाहेर आल्यानंतर पुन्हा भेटेन, असे त्याने म्हटल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे व्यापारी घाबरले असून त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रवींद्र राजूवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

Back to top button