डफरीन रुग्णालयात गर्भवतींची परवड

दहा महिन्यांत 30 हून अधिक महिलांना इर्विनमध्ये हलविले

चार गर्भवतींचा मृत्यू; अतिदक्षता विभाग अद्यापही बंद

अमरावती/10 नोव्हेंबर – गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे प्राण वाचविण्यासाठी तातडीने उपचार मिळणे आवश्यक असताना अमरावतीच्या डफरीन महिला रुग्णालयातील अतिदक्षता विभाग अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे गंभीर अवस्थेतील गर्भवती महिलांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील इर्विन रुग्णालयात हलवावे लागत आहे. गेल्या 10 महिन्यांत 30 हून अधिक महिलांना इर्विनमध्ये पाठविण्यात आले असून, त्यापैकी 4 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यातही 2 महिलांना प्रसूतीसाठी इर्विनमध्ये हलविण्यात आले. त्यापैकी एका महिलेने मृत बालकाला जन्म दिला.
गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीच्या वेळी महिलांना अचानक गंभीर त्रास होऊ शकतो. अतिरक्तस्राव, उच्च रक्तदाब आणि अन्य गुंतागुंतीच्या परिस्थितीत काही मिनिटांत उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, डफरीनमध्ये अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध असूनही तो सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविताना वेळ वाया जात आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या काळात 30 हून अधिक महिलांना इर्विनमध्ये पाठविण्यात आले. जुलै महिन्यातही एका गंभीर गर्भवतीची प्रसूती इर्विनमध्ये करावी लागली होती. डफरीनमध्ये अतिदक्षता विभाग सुरू झाल्यास महिलांना एकाच ठिकाणी तातडीचे उपचार मिळतील. मात्र, हा विभाग कधी सुरू होणार आणि आरोग्य प्रशासन यासाठी ठोस पावले कधी उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मातामृत्यू रोखण्यासाठी सुविधा केव्हा?
माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, डफरीनसारख्या महिला रुग्णालयात अतिदक्षता विभाग बंद असल्याने गंभीर रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलवावे लागत आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास माता आणि नवजात बालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे हा विभाग तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

Back to top button