न्यू म्हाडा कॉलनीत टोळीयुद्धातून खुनाचा बदला घेण्याचा थरार
शस्त्रांसह घरात घुसून गुंडांचा आईला धमकावण्याचा प्रकार

चारही हल्लेखोरांवर गुन्हा दाखल; एकाची दुचाकी जप्त
अमरावती /10 नोव्हेंबर- शहरातील न्यू म्हाडा कॉलनीत रात्री गणेश कोहळेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सीताराम टोळीतील सशस्त्र गुंडांनी अमन नावाच्या तरुणाच्या घरात थेट घुसून प्रचंड हैदोस घातला. हातात चाकू आणि तलवारी नाचवत आलेल्या गुंडांनी त्याच्या आईला घेरून मुलाला ठार मारण्याची थेट धमकी दिली. या थरारक प्रकारामुळे संपूर्ण वस्तीत घबराट पसरली असून नागरिकांनी धाव घेताच हल्लेखोर दुचाकी सोडून पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या अकोली भागातील न्यू म्हाडा कॉलनीत रात्री टोळीयुद्धाचा अत्यंत थरारक आणि धक्कादायक प्रकार समोर आला. जुन्या वैमनस्यातून व गणेश कोहळे याच्या झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी सीताराम टोळीच्या चार गुंडांनी थेट वस्तीत घुसून दहशत माजवली. दुचाकींवरून आलेल्या या हल्लेखोरांच्या हातात नंग्या तलवारी आणि टोकदार चाकू होते. त्यांनी कसलीही भीती न बाळगता थेट अमन नावाच्या तरुणाच्या घराचा दरवाजा गाठला आणि आत प्रवेश केला. घटनेच्या वेळी घरात तक्रारदार 47 वर्षांची महिला जेवण आटोपून शांतपणे बसली होती. घराबाहेर अचानक दुचाकींचा मोठा आवाज झाला आणि हल्लेखोरांनी वाहने उभी करून घराकडे बोट दाखवत हीच अमनची आई असल्याचे एकमेकांना सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता हातात धारदार शस्त्रे घेऊन हे तरुण घरात घुसले. अचानक समोर उगारलेली शस्त्रे आणि गुंडांचा आक्रमक पवित्रा पाहून महिला प्रचंड घाबरली. तिने जिवाच्या आकांताने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.गुंडांनी त्या महिलेला घेरून शिवीगाळ करत तुझ्या मुलाला समजावून सांग, त्याने आमच्या दोस्ताचा काटा काढला आहे, आता आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही, त्यालाही संपवून टाकू अशी थेट धमकी दिली. घरातून येणारा महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक आणि इमारतीतील नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले. लोक जमा होत असल्याचे पाहताच हल्लेखोरांची पाचावर धारण बसली आणि त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.नागरिकांचा वाढता दबाव पाहून आरोपींनी तळमजल्यावर उभी असलेली आपली एक दुचाकी तिथेच टाकून दिली आणि दुसर्या दुचाकीवर चौघेही कोंबून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या संपूर्ण गोंधळामुळे शांत असलेल्या न्यू म्हाडा कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली आणि महिलेच्या तक्रारीवरून चारही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला.





