ई-चलनाच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा फंडा
वाहनधारकांना बनावट दंडाच्या संदेशातून गंडविण्याचा प्रयत्न

अनोळखी संदेशाबाबत सतर्कतेचे वाहतूक पोलिसांचे आवाहन
अमरावती/24 नोव्हेंबर – वाहतूक नियम मोडल्याच्या नावाखाली वाहनधारकांच्या मोबाईलवर बनावट दंडाचे संदेश पाठवून त्यांच्या बँक खात्यांतील रक्कम लंपास करण्याचा सायबर भामट्यांचा नवा प्रकार समोर आला आहे. वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचे सांगून तातडीने दंड भरण्यासाठी अनोळखी दुवा पाठवला जात आहे. या दुव्यावर क्लिक करताच बनावट संकेतस्थळावरून बँक खाते, रोख रक्कम काढण्याचे यंत्र, पतपत्र आणि इतर खासगी माहिती मिळवली जात आहे. त्यानंतर खात्यातील पैसे चोरले जाण्याची शक्यता असल्याने अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर अधिकृत ई-चलनाची माहिती वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवली जाते. मात्र, याच पद्धतीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार सरकारी संदेशासारखे दिसणारे बनावट संदेश पाठवत आहेत. त्यामध्ये दंड भरलेला नसल्याचे सांगून त्वरित पैसे भरण्याची सूचना केली जाते. संदेशासोबत दिलेल्या दुव्यावर क्लिक केल्यानंतर वाहनधारकाला बनावट संकेतस्थळावर नेले जाते. तेथे बँक खात्याची माहिती, पतपत्र क्रमांक आणि इतर गोपनीय तपशील मागितले जातात. घाईघाईत ही माहिती भरल्यास आर्थिक फसवणूक होऊ शकते. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये. त्यातील दुवा उघडू नये किंवा कोणालाही बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये. वाहनावर दंड प्रलंबित आहे की नाही, याची खात्री महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत भ्रमणध्वनी उपयोजनाद्वारेच करावी. अमरावती वाहतूक विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, थोडीशी सावधगिरी बाळगल्यास कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवता येतील, असे स्पष्ट केले आहे.
बनावट ई-चलनापासून अशी घ्या काळजी
ई-चलनाच्या नावाखाली आलेल्या अनोळखी संदेशांना प्रतिसाद देऊ नका. संदेशातील दुव्यावर क्लिक करून बँक खात्याचा तपशील, गुप्त संकेतांक किंवा पतपत्राची माहिती भरू नका. दंडाची खात्री केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच करा. संशयास्पद संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. कोणतीही आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. वेळीच घेतलेली खबरदारी सायबर फसवणूक टाळण्यास मदत करू शकते.





