518 उपकरणांचा कोणार्कचा ताफा रस्त्यावर, कचरा संकलन सुरु

1,251 कर्मचारी, मोठी यंत्रसामग्री आणि शेकडो वाहने तैनात

अमरावती /2 डिसेंबर – शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि आधुनिक पद्धतीने करण्याचा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सोमवारपासून प्रत्यक्षात उतरला आहे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, उल्हासनगर या संस्थेला देण्यात आलेल्या कामादेशानंतर कंपनीने तब्बल 518 उपकरणे आणि 1,251 कर्मचारी तैनात करून कचरा संकलन व वाहतुकीचे काम जोमाने सुरू केल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शहरात निर्माण होणारा कचरा संकलित करून प्रभागनिहाय केंद्रांमधून अकोली आणि सुकली या प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत वाहतूक तातडीने सुरू झाली आहे. संपूर्ण शहर व्यापणार्‍या या कामासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. 8 टन क्षमतेचे दहा ट्रक, चौदा घनमीटर क्षमतेचे बारा संपीडक वाहन, तसेच पाच जेसीबी यांसह सत्तावीस जड वाहने रस्त्यावर उतरली आहेत. त्याचबरोबर 1,500 किलो क्षमतेचे दोनशेवीस स्वयंचलित टिपर, चव्वेचाळीस हायड्रॉलिक वाहन, टाटा मालवाहू, दोनशेवीस हातगाड्या, पाच पोकलेन, दोन ट्रॅक्टर-ट्रेलर आणि बारा संपीडक यंत्रणा शहरभर सुसज्ज करण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागात वीस कर्मचारी, तसेच चालक, सहाय्यक आणि हातगाडीवरील कर्मचारी मिळून एकूण 1,251 मनुष्यबळ संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम हाती घेत आहे. महापालिकेसोबतच्या करारानुसार कामकाज सुरळीत आणि नियोजनबद्धरीत्या सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून, आगामी काळात कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button