द्वारकेत श्रीमद् भागवत कथेनिमित्त ग्रंथदिंडींने जल्लोष

श्री संत गजानन महाराज संस्थान फुलआमला व चवणे परिवाराचे आयोजन

अमरावती/12 जून: नांदगाव खंडेश्वर तालुक्याअंतर्गत येणार्‍या फुलआमला येथील श्री संत गजानन महाराज संस्थान आणि महादेवराव चवणे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरात मधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र द्वारका येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 9 ते 15 जून या कालावधीत द्वारका येथील ’वांझा ज्ञातीधर्मशाळा’ येथे हा धार्मिक सोहळा पार पडत आहे.सध्या सुरू असलेल्या ’अधिक मास’ निमित्त हिंदू धर्मात श्रीमद् भागवत कथेचे श्रवण करण्यास अत्यंत विशेष आणि पवित्र धार्मिक महत्त्व मानले जाते. याच मंगलमय पर्वाचे औचित्य साधून चवणे परिवाराने या कथेचे आयोजन थेट भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीत केले आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजता जगप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरापासून अत्यंत उत्साहात भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. त्यानंतर संस्थानचे अध्यक्ष महादेवराव चवणे, अमोल चवणे आणि सौ. रोहिणी चवणे यांच्या हस्ते पवित्र व्यासपीठ व श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन करण्यात आले. पूजन विधी आटोपल्यानंतर विख्यात कथावाचक ह.भ.प. पांडुरंग महाराज कट्यारमल यांच्या सुश्राव्य आणि रसाळ वाणीतून संगीतमय भागवत कथेला प्रारंभ झाला. महाराजांच्या सुमधुर निरूपणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत. या कथेला संगीत साथ देण्यासाठी अमरावती परिसरातील नामवंत कलाकार संजय कडू, नानाजी गवळी, सुनील भगत, बाळकृष्ण अनवाने आणि चरणदास हेलोडे हे आपली सेवा देत आहेत. या सात दिवसीय ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये कथेसोबतच इतरही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त द्वारकेत दाखल झाले असून, संपूर्ण वांझा ज्ञातीधर्मशाळेत भक्तीचा पूर ओसंडून वाहत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button