विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची सदिच्छा भेट

विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरला

अमरावती/12 जून: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटर आता तरुण उद्योजकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. येथे राबवल्या जाणार्‍या स्टार्टअप उपक्रमांची दखल घेत विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी नुकतीच या केंद्राला भेट दिली.
यावेळी त्यांनी स्टार्टअप्सच्या कार्यपद्धतीची, त्यांना मिळणार्‍या तांत्रिक-आर्थिक मदतीची आणि भविष्यातील संधींची बारकाईने माहिती घेतली. ही भेट केवळ पाहणीपुरती मर्यादित न राहता, उद्योग, शिक्षण आणि प्रशासन यांच्यातील एक नवा धागा गुंफणारी ठरली. विद्यापीठ स्तरावर असे उपक्रम राबवून युवकांच्या हाताला काम आणि त्यांना उद्योजकतेचे बळ देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत नयना गुंडे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची अंमलबजावणी- या भेटीदरम्यान, ’मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना विभागीय आयुक्तांच्या हस्ते रुजू आदेश देण्यात आले. राज्यभरात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आघाडीवर असून, यामुळे हजारो हातांना रोजगाराचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. याप्रसंगी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त द. ल. ठाकरे, उपविभागीय आयुक्त संजय जाधव, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर, सीईओ आनंद यादव आणि व्यवस्थापक अमोल हेरुळकर उपस्थित होते. या उपक्रमांमुळे भविष्यात स्थानिक पातळीवर उद्योजकता संस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button