अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युवा स्वाभिमान दबावाच्या पवित्र्यात

अमरावती/13 मे– राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात वाजणार असून, त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानपरिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी 17 आमदारांची भर पडणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर आणि अमरावती येथे या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक सोपी नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 453 मतदार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे अवघ्या 150 मतदारांची यादी आहे. वास्तविक महायुतीत अनेक निवडणुकांमध्ये मतभेद समोर आले असून प्रत्यक्षात निवडणूक कशी पार पडेल, याची चाचपणी सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 453 नगरसेवक नवीन आमदार निवडणार आहेत. जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि युवा स्वाभिमान यांची महायुती आहे. मात्र, प्रत्यक्षात अलीकडच्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध युवा स्वाभिमान अशी लढत उघडपणे झाली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपविरुद्ध उमेदवार दिले होते, तर शिंदे सेनेने भाजप आणि राष्ट्रवादीविरुद्ध उमेदवार दिले होते. तसेच राष्ट्रवादीने युवा स्वाभिमानविरुद्धही उमेदवार दिले होते. त्यामुळे आज जर आपण महायुतीच्या मतदारांचा विचार केला, तर 227 मतदान असूनही महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपचा उमेदवार सहज निवडून येईल, अशी अजिबात शक्यता नाही.गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत स्थानिक राजकारण सातत्याने बदलले असून प्रवीण पोटे विरुद्ध रवी राणा अशी लढत जिल्ह्याने पाहिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव ज्या नेत्यांमुळे झाला असा दावा रवी राणा करतात, त्यामध्ये प्रवीण पोटे, संजय खोडके आणि बच्चू कडू हे त्यांच्या निशाण्यावर असतात. काँग्रेस तर विरोधातच होती, त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अशा निवडणुकीत एकमेकांचे हिशोब चुक्ते केले जातात. पर्यायाने महायुतीचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा जोरात सुरू आहे. सोमवार दि. 11 रोजी भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जाहीरपणे मागणी केली की, डॉ. धांडे यांना आमदार करायला पाहिजे. या मागणीमागे काही दिवसांवर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा संदर्भ आहे.
नवनीत राणा यांच्या मागणीवर पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राजकारणात पदे येतात आणि जातात, पण माणूस कसा जगला याला जास्त महत्त्व आहे. डॉ. नितीन धांडे हे शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हातून असेच पुण्यकार्य आणि संस्काराचे कार्य घडत राहावे. राहिला प्रश्न राजकीय अपेक्षांचा, तर तिकीट मिळाले तर लढायचे आणि नाही मिळाले तर नाही लढायचे, पण पक्ष संघटना मजबूत ठेवायची, असे त्यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी नवनीत राणांच्या विधानाचा धागा पकडत प्रवीण पोटे यांच्या संदर्भात भाष्य केले की, आमदार होण्याचे स्वप्न पाहणे काही वाईट नाही. डॉ. धांडे यांचे काम चांगले आणि समर्पित आहे, त्यांचीही वेळ येईल; मात्र लगेच कोणीही असे समजू नका की पोटे यांच्यावर बॉम्ब पडला आहे.
पालकमंत्री बावनकुळे यांच्या या विधानानंतर युवा स्वाभिमानचा कल डॉ. नितीन धांडे यांच्या बाजूने असेल, असे कुठेतरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रवीण पोटे यांच्या नावाला विरोध करण्यापेक्षा डॉ. नितीन धांडे यांना समर्थन देणे नवनीत राणा यांना सोयीचे वाटले. या प्रसंगातून महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे नाही, हेच दिसून येते. परिणामतः नवनीत राणा यांनी दबाव निर्माण केला आहे का? डॉ. धांडे यांचे नाव पुढे करून त्यांना पोटे यांना आपला विरोध दर्शवायचा आहे का? मात्र नवनीत राणा यांनी पोटे यांना आपला विरोध असल्याचे स्पष्टपणे म्हटलेले नाही. महानगरपालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने युवा स्वाभिमान आणि भाजपची युती होता होता त्यांनी थेट एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले आणि त्याचा फायदा युवा स्वाभिमानला झाल्याचे दिसले, तशीच भूमिका या निवडणुकीत भाजपला अडचणीत आणणारी ठरेल का? किंवा भाजपचा आवडता उमेदवार कोण असेल? नवनीत राणांच्या माध्यमातून असे जाहीरपणे सांगण्याची युवा स्वाभिमानला आवश्यकता का वाटली? यावर आता राजकीय क्षेत्रात जबरदस्त चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button