अचलपुरात निवडणुकीचा शेवटचा दिवस रॅलींनी दणाणला
आज मतदानानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भाग्य होणार सीलबंद

शिवसेना आणि प्रहार यांच्या रॅलीमुळे विरोधकांना धडकी
बच्चू कडू ठरणार का गेम चेंजर?
परतवाडा /1 डिसेंबर : अचलपूर नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काल प्रचाराचा अखेरचा दिवस प्रचंड शक्तीप्रदर्शनाने गाजला. सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या उभाता गटाच्या उमेदवारांसाठी अचलपूर येथील काळा हनुमान मंदिर परिसरातून भव्य पायदळ रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण अचलपूर शहर पिंजून काढत परतवाड्याच्या दिशेने वाटचाल केली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला-पुरुष शिवसैनिकांचा सहभागी होता. कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. उमेदवार तसेच पदाधिकारी नागरिकांना हात जोडून मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत होते. दुसरीकडे प्रहारचे सर्वेसर्वा व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची प्रचार रॅलीही अचलपूर-परतवाड्यात पाहायला मिळाली. प्रहारच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सारिका अनिल पिंपळे या ‘बॅट’ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या प्रचारार्थ परतवाड्यातील वाघामाता संस्थानपासून बच्चू कडू यांनी प्रचंड रॅली काढली. या रॅलीने परतवाडा आणि अचलपूर शहर अक्षरशः गाजवून टाकले.या दोन्ही पक्षांच्या दमदार रॅलीमुळे विरोधी उमेदवारांच्या मनातही चिंता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. रॅलींच्या प्रचंड प्रतिसादामुळे नागरिकांसमोर कोणाला निवडून द्यावे, असा प्रश्नही निर्माण झाला असावा. आता सुज्ञ मतदारांना योग्य उमेदवार ठरवण्यासाठी काही तासच शिल्लक आहेत.2025 ची नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनपेक्षित कलाटणी देणारी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. मतदारांची मतं आपल्या बाजूला खेचण्यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी डावपेच आणि रणनीती आखताना दिसत आहेत. आज होणार्या मतदानानंतरची टक्केवारी लक्षवेधी ठरणार असून, त्यावरच उमेदवारांचे भाग्य अवलंबून राहणार आहे. शहरात काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि प्रहार या चारही पक्षांमध्ये तीव्र लढत रंगली आहे. विशेषत: प्रहारचे बच्चू कडू या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




