वैभव कॉलनीत महिलेची हत्या
सीसीटीव्ही कॅमेर्यांचा डीव्हीआर गायब

* श्वान पथकाची घेतली मदत
अमरावती /30 नोव्हेंबर : शहरातील वैभव कॉलनी परिसरात एका 40 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शहरात आधीच वाढत्या गुन्हेगारीमुळे निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण आणखी गडद झाले आहे. पिंकी उर्फ नीलिमा संजय खरबडे या महिलेला अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून ठार मारले. मागील पंधरा दिवसांत झालेली ही तिसरी हत्या ठरत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत.
ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. नेहमीप्रमाणे साफसफाई कामगार अशोक डोंगरे हे महिलेच्या घरी आले असता त्यांनी महिलेला आवाज दिला, मात्र आतून उत्तर न मिळाल्याने ते परत गेले आणि दुपारच्या सुमारास पुन्हा त्य महिलेच्या घरी आले आणि आवाज देऊ लागले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना शंका निर्माण झाली. त्यांनी तातडीने मृतकाच्या बहिणीच्या मुलाला कळविले. नातेवाईकांनी मागील बाजूने घरात प्रवेश केल्यानंतर पांघरूण हलविताच महिलेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून सर्वांच्या अंगावर शहारे आले. तत्काळ 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती देण्यात आली. राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार पुनीत कुलट पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात महिलेला धारदार शस्त्राने गळा चिरून ठार मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून मृत्यू साधारण 24 तासांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या हत्येत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचा डीव्हीआर संशयित आरोपीने घटनास्थळावरून उचलून नेला आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानेच हा डीव्हीआर घेऊन जाण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फोरेन्सिक तज्ञांचे पथक, श्वानपथक तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घरातील सर्व पुरावे, रक्ताचे नमुने, हालचालींचे ठसे आणि जबरदस्तीची शक्यता यांचा सखोल तपास सुरू आहे. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे ठोस संकेत अद्याप मिळाले नसले तरी घरातील वस्तूंची रचना आणि हालचालींचा मार्ग यावरून गुन्हेगाराने नेमकेपणाने काम केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.मृतकाच्या घराच्या भिंतीवर एक गंभीर आणि संशयास्पद संदेश लिहिलेला आढळल्याने पोलिसांनी या घटनेचा तपास त्या दिशेनेही सुरू केला आहे. हा संदेश गुन्हेगाराचा इशारा आहे की दिशाभूल करण्याचा प्रयत्न, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्व शक्य कोनातून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. पोस्टमार्टेम अहवालाला या प्रकरणात महत्त्वाचे स्थान असून, रात्री उशिरापर्यंत तपासाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला नव्हता. पोस्टमार्टेमानंतर मृत्यूची अचूक वेळ, हत्येची पद्धत, प्रतिकाराची चिन्हे आणि इतर तांत्रिक माहिती स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. या क्रूर घटनेने वैभव कॉलनी परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. विशेषत: एकाकी राहणार्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. पंधरा दिवसांत सलग तीन हत्या झाल्याने शहरातील वातावरणात असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तसेच स्थानिक सूत्रांचा वापर करून तपास सुरू केला असून विशेष पथके आरोपींचा शोध घेत आहेत. संशयास्पद व्यक्ती, हालचाली किंवा कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे द्यावी, असे आवाहन राजापेठ पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोरील आव्हान अधिक गंभीर झाले असून नागरिकांमध्ये या प्रकरणाचा तत्काळ उलगडा व्हावा, अशी जोरदार मागणी व्यक्त होत आहे.
भिंतीवर संशयास्पद संदेश
मृतक नीलिमा खरबडे यांच्या घरातील भिंतीवर एक गंभीर, धक्कादायक आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारा संदेश लिहिलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. हा संदेश केवळ साधा लिहिलेला मजकूर नसून, गुन्ह्याच्या हेतू, गुन्हेगाराच्या मानसिकतेचे संकेत आणि प्रकरणातील शक्य दिशाभूल यांबाबत अनेक शंका निर्माण करणारा आहे.





