धार्मिक ध्वजावर बोट उचलणार्यांचे बोट कापले पाहिजे
माजी खा.नवनीत राणांचे आक्रमक वक्तव्य

अमरावती/27 नोव्हेंबर – अमरावतीतील एका निवडणूक प्रचार सभेत केलेल्या वक्तव्यामुळे माजी खासदार व भाजपानेत्या नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी धार्मिक ध्वजाचा अपमान करणार्यांविरुद्ध कडक भूमिका घेत, धार्मिक ध्वजावर बोट उचलणार्यांची बोटे कापली पाहिजेत, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल झाला असून राजकीय व सामाजिक स्तरांवरून यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सभा संबोधित करताना राणांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. योगीजी म्हणाले होते. तुम्ही फूट पाडली तर तुम्हाला कापले जाईल. पण आम्ही आता ना फूट पाडणार, ना कापले जाणार; आम्ही एकत्र राहू, असा संदर्भ देत राणांनी पुढे धार्मिक ध्वजाचा अवमान करणार्यांविरुद्ध कारवाईचा सूर लावला. त्यांच्या मते, धर्माचा अपमान हे सहन न करण्यासारखे कृत्य आहे आणि त्याविरोधात कडक घाव घालणे गरजेचे आहे. अयोध्येतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मध्वज फडकवल्यानंतर पाकिस्तानासह काही ठिकाणांहून विरोधाचे सूर उमटत असल्याचे राणांनी भाषणात नमूद केले. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, देशाच्या धर्मध्वजावर कोणी बोट दाखवले, तर आपण तितक्याच कठोरपणे विरोध करण्यास तयार असले पाहिजे. गरज भासल्यास त्यांची बोटेही कापण्याचा विचार करावा. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. भाषणात वापरलेल्या शब्दांमुळे तणाव वाढू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, तर समर्थक त्यांच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देत आहेत. नवनीत राणा यांच्या वक्तव्याचा पुढील राजकीय घडामोडींवर कसा परिणाम होईल, याकडे राज्याचे लक्ष आहे.




