अमरावतीची औद्योगिक स्थिती चिंताजनक
आ.खोडके विधीमंडळात आक्रमक

अमरावती /24 मार्च – राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत अमरावतीची औद्योगिक स्थिती चिंताजनक असून, येथे सर्वात कमी उद्योग असल्याची बाब आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत मांडली. अमरावती औद्योगिक वसाहतीत पायाभूत सोयी असूनही नवीन गुंतवणूक येत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रलंबित प्रकल्पांमुळे रोजगारावर परिणाम होत असल्याचे सांगताच, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावती विभागासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खोडके यांनी ’पीएम मित्रा’ टेक्स्टाईल पार्क, रेमंड कंपनीचा प्रकल्प आणि भारत डायनॅमिक्सच्या रखडलेल्या कामावर बोट ठेवले. जमिनीचे दर, पाण्याची वाढीव किंमत आणि जाचक अटींमुळे उद्योजक अडचणीत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास विभागाचा कायापालट होईल, असे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक विकासाचा आढावा
अमरावती विभागात उद्योगांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पाणी दरातील सवलत आणि इतर तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी लवकरच मंत्रालयात विशेष बैठक पार पडेल.




