65 कोटी रुपयांची वरुडची पाणीपुरवठा योजना अपूर्णच

पाणीपुरवठयाच्या टाक्या बनल्या शोभेची वस्तू : 2 वर्षांपासून काम बंदच

वरुड । 23 नोव्हेंबर – गेल्या अनेक वर्षांपासून वरुड शहराला लोणी नजीकच्या जमालपूर येथून पाणीपुरवठा केला जात आहे, पाणीपुरवठा होत असताना अत्यंत खर्चिक ही योजना असल्यामुळे आणि वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे वरुड शहराला सातत्याने अनियमित पाणीपुरवठा होत आहे, शहराला सद्य: चौथ्या दिवशी अनेक वर्षांपुर्वींपासून पाणीपुरवठा केला जात आहे. अशा स्थितीत पुसला नजीकच्या पंंढरी मध्यम प्रकल्पातून वरुड शहराकरीता सायफन पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र शासनाकडून 65 कोटी रुपयांंचा विशेष निधी मंजुर करुन वरुड शहराची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणली. या योजनेतुन वरुड शहरातील विविध भागांमध्ये 4 पाण्याच्या टाक्या सुद्धा बांधण्यात आल्या, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करीता आवश्यक असलेल्या पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आल्या परंतु अद्यापही योजना सुरु न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. सन 2021 मध्ये देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत ही योजना मंजूर करून आणली या योजनेसाठी निधी पण प्राप्त झाला, नगर परिषदेने आपला हिस्सा सुद्धा शासनाकडे भरला आणि कत्राटदाराला काम करण्याचे आदेश सुद्धा प्राप्त झाले. अशा स्थितीत कंत्राटदाराने सुरुवातीला प्रचंड उत्साहात कामे सुरू केली आणि गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ही कामे अत्यंत थंडबस्त्यात दिसून येत आहे. सद्य: जमालपूर येथून पाणीपुरवठा करीत असताना नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहे. नगरपरिषदेचा जास्तीत जास्त निधी हा वरुड शहराच्या पाणीपुरवठावर खर्च होत असतांना या निधीची बचत व्हावी, या मुख्य हेतूने वरुड शहराकरीता पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली परंतु कुठे पाणी मुरले? हे सुद्धा कळायला मार्ग नाही. अशा स्थितीत गेल्या साडेचार वर्षांपासून वरुड नगर परिषदेवर प्रशासक असताना ही पाणीपुरवठा योजना अद्यापही सुरू होऊ शकली नाही, त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून आणि शेवटच्या टप्प्यातील काम अपूर्ण असतांना ही योजना आता पूर्ण कधी होणार आणि झाली तर वरुड शहराला पाणीपुरवठा कधी मिळणार? असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. ही योजना जर सुरु झाली तर वरुड शहराला सद्य: चौथ्या दिवशी मिळणार्‍या पाणीपुरवठा हा किमान दुसर्‍या दिवशी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना ही योजना सुरू होण्यासाठी आता पुढाकार घेणार तरी कोण? असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उभा ठाकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वरुड शहरातील विविध भागांमध्ये चार पाण्याच्या टाक्या शोभेच्या वास्तु म्हणुन उभ्या आहेत परंतु या टाक्यांचे पुढे काय? पुढील महिन्यात होऊ घातलेल्या वरुड नगर परिषदेच्या निवडणुकांचा माहोल सर्वत्र गरम होत असतांना वरुड शहरातील मुख्य पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार तरी कोण? असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासुन पंंढरी मध्यम प्रकल्पातून वरुड शहराकरीता पाणीपुरवठा करण्याकरीता आवश्यक त्या पाईपलाईनकरीता रेल्वे आणि वनविभागाकडून येणार्‍या अडचणी सुध्दा दूर झाल्याचे कळते परंतु आता पाणी कुठे मुरत आहे? हेच कळायला मार्ग नाही, त्यामुळे 3 डिसेंबर रोजी निवडुन येणार्‍या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी वरुड शहराच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा, अशी मागणी होत आहे.

मी आमदार झाल्यानंतर प्राधान्यक्रमाने वरुडच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, शासनाकडून पाणीपुरवठा योजनेकरीता 65 कोटी रुपये मंजुर करुन आणले, ते कामही सुरु झाले, पाणीपुरवठा योजनेचे काम अंतीम टप्प्यात आले असतांना देवेंद्र भुयार यांना त्याचे श्रेय मिळु नये, म्हणुन पुर्णपणे कट रचुन ही योजना ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत ठेवुन ती अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button