मेळघाटात वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार

हरिसालच्या जंगलात शिकार

-वर्षभरात चौथी घटना
-परिसरात खळबळ, गावकरी दहशतीते
अमरावती / 4 जून: इंधन आणण्यासाठी जंगलात गेलेल्या एका व्यक्तीला वाघाने शिकार करुन ठार केल्याची घटना मेळघाटातील हरिसालनजीकच्या जंगलात घडली. मन्नू बाबला जावरकर (वय 60, रा. हरीसाल) असे वाघाने ठार केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सोमवारी इंधन आणण्यासाठी जंगलात तीन किलोमीटर आतमध्ये गेला होता. परत न आल्याने कुटुंबिय व गावकर्‍यांनी त्याचा जंगलात शोध घेतला असता आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. त्याला वाघाने ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गावकरी दहशतीत आहेत. वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात मानवी जिवितहानीची ही चौथी घटना आहे.
मन्नू जावरकर हा नेहमीच जंगलामध्ये मोळी आणण्यासाठी जात होता. मोळी आणून गावामध्ये विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. परिस्थिती अतिशय गरिबीची व हलाखीची असल्यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. कुटुंबाचे पालन पोषण करायचा. सोमवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी तो गेला होता. तेव्हापासून तो परत आलाच नाही. सायंकाळी व दुसर्‍या दिवशी मंगळवारी कुटुंबिय आणि गावकर्‍यांनी शोध घेतला परंतु त्याचा पत्ता लागला नाही.
बुधवारी चौराकुंड मार्गावर दोन किलोमीटर आत जंगलामध्ये मन्नूचा मृतदेह आढळला. मन्नुच्या शरीराची पूर्ण हाडे वाघाने चावून चावून खाल्ल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मन्नूच्या मृतदेहाच्या आजूबाजूला वाघाचे पगमार्क आढळल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेमुळे मेळघाटात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघाने या वर्षात दीड वर्षात चार लोकांना ठार केले आहे.
पोलिस आणि डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर शासकीय नियमानुसार मृतकाच्या नातेवाईकांना मदत देण्यात येईल असे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी सांगितले आहे. तसेच जंगलाच्या जास्त आत मध्ये कोणीही जाऊ नये, काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी वनविभागाच्या मदतीचा 10 हजार रुपयांचा धनादेश मन्नू जावरकर याच्या कुटुंबाला दिला. यावेळी एसीएफ मोगरे, आरएफो दाईत व वनाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

-नरभक्षी वाघाला जेरबंद करा
अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी वाघाच्या हल्ल्यात एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच नरभक्षी वाघामुळे परिसरातील आदिवासींचा जीव धोक्यात आल्याने त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. या नरभक्षी वाघाला तातडीने जेरबंद करुन परिसरातील गावकर्‍यांना दहशतीतून मुक्त करावे, असे निर्देश वन विभागाला दिले आहेत. पिडित परिवाराला तात्काळ शासकिय मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यासही त्यांनी संबंधितांना सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button