अमरावतीच्या विधिजगताचा सुवर्णक्षण

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या फेअरवेलला बार पदाधिकारी प्रत्यक्ष साक्षीदार

अमरावती / 21 नोव्हेंबर – भारतीय न्यायव्यवस्थेच्या शिखरावर पोहोचलेले अमरावतीचे सुपुत्र, सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचे 23 नोव्हेंबर रोजी होणारे निवृत्तीसमारंभाचे औचित्य, दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय सभागृहात एका सन्मानपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. या निरोप समारंभाला अमरावती बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणे, हे स्वतःच अमरावतीच्या न्यायपरंपरेचे अभिमानपत्र ठरले.
निवृत्तीच्या आदल्या दिवशीही सरन्यायाधीश गवई यांनी नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात हजेरी लावून नियमित कामकाज केली. देशाच्या सर्वात मोठ्या न्यायासनावर विराजमान असलेला न्यायाधीश शेवटच्या दिवशीही तेवढ्याच निष्ठेने कामकाज पूर्ण करतो, हा दृष्य अनेकांसाठी न्यायनिष्ठेची जिवंत शिकवण ठरले. कामकाजानंतर त्यांच्या चेंबरमध्ये न्यायाधीश, वरिष्ठ वकील आणि सहकारी विधिज्ञांच्या भेटींची गर्दी उसळली होती. अनेकांनी त्यांच्या न्यायनिवाडयातील संवेदनशीलता, तटस्थता आणि मानवी मूल्यांवरील भक्कम विश्वासाचा विशेष उल्लेख केला. सायंकाळी झालेल्या फेअरवेल कार्यक्रमात प्रशासकीय सभागृह अक्षरशः खचाखच भरून गेले होते. वकिली आणि न्यायक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, त्यांच्या भाषणातील आदरभाव आणि गौरवोद्गार, या सर्वातून सरन्यायाधीश गवई यांच्या कार्याची सार्वजनिक प्रतिष्ठा स्पष्टपणे जाणवत होती. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या निर्णयांनी भारतीय न्यायशास्त्राला अनेक नवी दिशा दिली, हे अनेक वक्त्यांच्या भाषणातून अधोरेखित झाले. या ऐतिहासिक दिवशी अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख, अ‍ॅड. विवेक काळे, अ‍ॅड. बाबासाहेब भोकरे, अ‍ॅड. श्रीकांत खोरगडे, अ‍ॅड. अनिल विश्वकर्मा आणि अ‍ॅड. शहजाद नय्यर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. 2009 ते 2019 या काळात अमरावती न्यायालयात गवई यांच्यासोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव या प्रसंगी आणखी अर्थपूर्ण ठरला. अनेकांच्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली-कारण त्यांच्या सहवासात न्यायाची समज अधिक परिपक्व झाली होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अढळ न्यायनिष्ठेने, सौम्य स्वभावाने आणि संतुलित नेतृत्वाने सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात एक उज्ज्वल पान लिहिले आहे. त्यांच्या फेअरवेल कार्यक्रमात अमरावती बारची उपस्थिती ही केवळ औपचारिक घटना नव्हे, तर अमरावतीने दिलेल्या गुणी सुपुत्राचा केलेला गौरवही ठरला. देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर अमरावतीचा ठसा उमटवणार्‍या या थोर व्यक्तिमत्त्वाच्या निरोपाची नोंद, शहराच्या न्यायइतिहासात चिरकाल स्मरणात राहील, अशी भावना वकिलांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button