8 हजार सरकारी कर्मचार्‍यांची पगारवाढ थांबवली जाणार

माझी लाडकी बहीण योजनेचा घेतला लाभ

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई/21 नोव्हेंबर – महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत काम करणार्‍या काही सरकारी कर्मचार्‍यांच्या पगार वाढीवर स्थगिती घालण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. कारण, अपात्र असतानाही त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अनुचित लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे पाच हजार सरकारी कर्मचारी, तीन हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी ही योजना चुकीच्या पद्धतीने वापरली आहे. राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांनी योजनेमध्ये नोंदणी केली असून त्यातील 1 कोटी 30 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रक्रियेत उघड झालेल्या तपासानुसार काही कर्मचार्‍यांनी योजनेचा फायदा अनधिकृतपणे घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने या कर्मचार्‍यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा मार्ग सुरू केला आहे आणि स्वतंत्र छाननीसाठी आदेश दिले आहेत. पुढील महिनाभरात प्रत्येक विभागातील किती कर्मचार्‍यांनी योजनेचा लाभ घेतला, याची संपूर्ण माहिती तयार होईल आणि त्या-त्या विभागांना नोटीस पाठवली जाईल. अनधिकृतपणे मिळालेली रक्कम त्यांच्या पगारातून वसूल केली जाईल, तसेच या कर्मचार्‍यांच्या वार्षिक पगारवाढीवरही स्थगिती येण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भात अधिकृत नोटीस लवकरच जारी केली जाणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण न केलेल्या 1 कोटींहून अधिक महिलांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास सरकार पुढील निर्णय घेईल.

संबंधित बातम्या

Back to top button