अमरावतीत वाहतुकीचा गंभीर प्रश्न

रेल्वे उड्डाणपूल हे फक्त निमित्त, संपूर्ण शहरात वाहतुकीचे प्रश्न कायम

* नागरिकांचा प्रश्न : सुटणार तरी कधी? 

अमरावती /20 नोव्हेंबर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. गांधी चौक, इरविन चौक, राजापेठ, बसस्थानक मार्ग, सरदार पटेल चौक या सर्वच महत्त्वाच्या चौकांवर सकाळ-सायंकाळ वाहतुकीची प्रचंड गर्दी दिसत आहे. वाहनांची वाढलेली संख्या, अरुंद रस्ते आणि चुकीच्या ठिकाणी पार्किंग यामुळे शहरात दर काही मिनिटांनी कोंडीची पुनरावृत्ती होत आहे. राजकमल रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू आहे हे मात्र निमित्त आहे संपूर्ण शहरातच विविध कारणाने वाहतुकी समस्या उग्ररूप धारण करताना दिसून येत आहे.
वाहतूक शाखेने अनेक ठिकाणी मनुष्यबळ वाढवले असले तरी रस्त्यांची स्थिती आणि सुरू असलेली नागरी कामे यामुळे उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः शहरातील चालू असलेली ड्रेनेजची कामे व रस्ते दुरुस्तीमुळे महत्त्वाचे मार्ग अडथळ्यांनी भरले आहेत. त्यामुळे अवघ्या काही किलोमीटरचे अंतर पार करण्यास नागरिकांना अर्धा-एक तासापर्यंत वेळ लागत आहे. नागरिकांकडून सतत असा सवाल उपस्थित केला जात आहे की, अमरावतीची वाहतूक समस्या सुटणार तरी कधी? प्रशासनाकडून स्मार्ट सिग्नलिंग, फ्लायओव्हर कामे आणि पार्किंग व्यवस्थेची सुधारणा अशा योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्ष परिणाम दिसेपर्यंत नागरिकांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील वाहतूक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण झाले तर येत्या एक-दोन वर्षांत काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु सध्याच्या घडीला अमरावतीची वाहतूक समस्या ही नागरिकांसाठी दररोजचा डोकेदुखीचा विषय ठरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button