लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
गटशिक्षणाधिकार्यांच्या निर्णयाचे कौतुक

अमरावती /7 एप्रिल– पंचायत समिती अमरावती अंतर्गत केंद्रप्रमुख प्रभाराच्या नियमबाह्य नियुक्तीविरोधात प्रस्तावित आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना (जिल्हा शाखा अमरावती) चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित यांनी दिलेल्या निवेदनावर *माननीय गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे पंचायत समिती अमरावती* यांनी तातडीने दखल घेत चर्चा आयोजित केली. या चर्चेत संबंधित आक्षेपांवर सखोल विचार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती अमरावती गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी सदर प्रकरणावर शासन नियमांचा विचार करून कुणावरही अन्याय होणार नाही, अशा प्रकारचा योग्य व न्याय्य निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
कर्तव्यदक्ष तसेच शिक्षकांच्या न्याय हक्काला दाद देणारे अधिकारी म्हणून संदीप बोडखे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. या लेखी आश्वासनानंतर राजेंद्र दिक्षित यांनी 8 एप्रिल पासून सुरू होणारे आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चर्चेदरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित, जिल्हा सचिव किशोर मालोकार, प्रसिद्धी प्रमुख राजू डांगे, उर्दू प्रतिनिधी अफसर खान सर तसेच चेतवा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्येंदु अभ्यंकर हे उपस्थित होते. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तणाव निवळला असून आता प्रत्यक्षात होणार्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




