बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय

एनडीएला स्पष्ट बहुमत, नितीश कुमार ठरले किंगमेकर

बीजेपी 89    जदयू 85    एलजेपी 19      आरजेडी 25

काँग्रेस 6      इतर 3        अपक्ष 16        जनसुराज 0

* काँग्रेसचे पानीपत, जनसुराजला भोपळा

पाटणा /14 नोव्हेंबर : गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती ती बिहार विधानसभा निवडणूक निकालाची. बहुचर्चित अशा बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शुक्रवारी (ता. 14 नोव्हेंबर) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने एनडीए म्हणून जरी निवडणूक लढली असली तरी यामध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेससोबत महागठबंधनचे पानिपत झाले आहे.
बिहारमध्ये बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. दरम्यान, आता या निवडणुकांचा निकाल लागला असून अंतिम आकडेवारी समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संध्याकाळपर्यंत भाजपने 90 जागा, जदयू 84 जागा आणि एलजेपीने 19 जागा विक्रमी मताधिक्याने जिंकून 200 जागांचा टप्पा ओलांडला एनडीएच्या या झंझावातापुढे राजद 25 जागा आणि काँग्रेसला फक्त 6 जागा जिंकता आल्या आहेत. या विजयानंतर बिहारला सलग 20 वर्षे स्थिर सरकार देणारे व पंचाहत्तरी ओलांडलेले नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसणार की भाजप नवा चेहरा देणार यावर अद्याप स्पष्टता नाही.
एनडीएच्या या विजयात ऐन निवडणुकीआधी 10 हजार रुपये देणारी महिला रोजगार योजना गेमचेंजर ठरली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या योजनेचा लाभ दीड कोटी महिलांनी घेतला. महिलांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत या निवडणुकीत मतदान केले. पुरुषांच्या (62.8 टक्के) तुलनेत महिलांनी (71.6 टक्के) 8.8 टक्के अधिक मतदान नोंदवले. परिणामी 1951 नंतर बिहारमध्ये विक्रमी 66.91 टक्के मतदान नोंदवण्यात आले. या योजनेचा मोठा फायदा नितीश कुमारांच्या जदयूला झाला. गेल्यावेळी 43 जागा जिंकणार्याख जदयूच्या जागा दुपटीने वाढून 84 वर गेल्या. भाजपनेही 20 जागांची वाढ नोंदवली. गेल्यावेळी 1 जागा जिंकणारा लोकजनशक्ती पक्ष थेट 19 वर पोहोचला. या तुलनेत राजदची 50 जागांनी मोठी पिछेहाट झाली. मतचोरी आणि एसआयआरवरून भाजप व निवडणूक आयोगाला लक्ष्य करणार्याच राहुल गांधींकडे मतदारांनी सपशेल पाठ फिरवली. यामुळे काँग्रेस घसरून 19 वरून 6 जागांवर आला. मागच्या 30 वर्षांतील काँग्रेसची ही निच्चांकी आकडेवारी आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला मतदारांनी काही किंमत न दिल्याने त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.

 

संबंधित बातम्या

Back to top button