कंटेनरने अनेक वाहनांना उडवले, आगीत 8 जणांचा मृत्यू

पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

* 20 ते 25 जण जखमी

* मृतांच्या वारसांना 5 लाख मदत जाहीर

पुणे/13 नोव्हेंबर : पुण्यातील नवले पूल परिसरात मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं 20 ते 25 वाहनांना धडक दिली. हा कंटेनर धडका देत भरधाव वेगात निघाला होता. त्याच्यापुढे एक कंटेनर होता. त्या कंटेनरला धडक देण्याआधी ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं एका कारला धडक दिली. लहान कार दोन कंटेनरच्या मधोमध अडकली. या कारचा चक्काचूर झाला. सीएनजीवर चालत असलेल्या कारनं पेट घेतला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांनी प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.पुण्यातील नवले पूल परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातार्‍याहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली. हा कंटेनर मंद उतारावरुन खाली येत होता. जवळपास 20 ते 25 वाहनांना धडक देत तो पुढे गेला. त्यानंतर या कंटेनरनं एका फॅमिली कारला धडक दिली. कंटेनरची धडक बसल्यावर कार अचानक पुढे गेली. कारच्या पुढे दुसरा कंटेनर होता. दोन कंटेनरच्या मध्ये कार अडकली. कारमध्ये सीएनजीचा सिलिंडर होता. दोन कंटेनरच्या मधोमध अडकल्यानं कारचा चेंदामेंदा झाला. सिलिंडरचा स्फोट होताच आग लागली. त्यामुळे मागील कंटेनरदेखील पेटला. कंटेनरमधून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कारमधून दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह काढण्यात यश आलं आहे. आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डीसीपी संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा एक कंटेनर सातार्‍याकडून मुंबईच्या दिशेनं जात होता. नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. कारण उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान लहान आकारचे गतीरोधक आहेत. त्यामुळे कंटेनरचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली असावी. डीसीपी संभाजी कदम यांनी सध्या तरी घातापाताची शक्यता फेटाळली आहे. ’वाहनांमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्याला सध्या प्राधान्य आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. वाहनांना लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. दोन मोठ्या वाहनांना हटवण्यासाठी क्रेन आणल्या गेल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. या अपघातामागील कारणांचा तपास नंतर केला जाईल,’ अशी माहिती डीसीपी कदम यांनी दिली.
मृतांच्या वारसांना 5 लाख मदत जाहीर-मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना

प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही अपघातस्थळी धावलो. आम्ही पोहोचलो तेव्हा कारला आग लागलेली होती. ट्रकमध्ये अडकलेला एक जण मदतीसाठी आरडाओरडा करत होता. बहुधा तो क्लिनर होता. बाहेर काढा, बाहेर काढा असं तो मोठमोठ्यानं ओरडत होता. पण आगीची तीव्रता पाहता स्फोट होण्याची भीती होती. कधीही स्फोट होईल असं वाटत होतं. त्यामुळे मदतीसाठी कोणीच पुढे गेलं नाही.

संबंधित बातम्या

Back to top button