बच्चू कडू मैदानात, प्रहार पक्ष निवडणुकीच्या रणांगणात सज्ज!

अचलपूर, चांदुर बाजार, अंजनगाव, मोर्शी, वरूडमध्ये उमेदवारांची नावे जवळपास निश्चित

नगराध्यक्ष पदासाठी दमदार दावेदार; प्रहारचा झेंडा पुन्हा फडकवण्याची तयारी

अमरावती /13 नोव्हेंबर – आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची लगबग सुरू असताना, माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रणांगणात उतरायचे ठरवले आहे. अचलपूर, चांदुर बाजार, अंजनगाव, मोर्शी आणि वरूड या प्रमुख ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी प्रहारचे उमेदवार निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
अचलपूरमध्ये महिला नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने, कल्पना नंदवंशी आणि सारिका पिंपळे या प्रहारच्या दोन दमदार कार्यकर्त्यांची नावे चर्चेत आहेत. नगरसेवक पदांसाठीदेखील अनेक कार्यकर्ते उत्साहाने पुढे येत असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. चांदुर बाजार येथे नगराध्यक्षपदासाठी मीनाक्षी खुले, छाया कोरडे आणि माजी नगराध्यक्ष शुभांगी देशमुख या तिन्हींची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर नगरसेवक पदांसाठी बच्चू कडू समर्थक मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. प्रहार पदाधिकारी आपापसात चर्चा करून पक्षप्रमुख बच्चू कडू यांची अंतिम मान्यता घेतल्यानंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे.अंजनगाव, मोर्शी, वरूड, चिखलदरा आणि धामणगावमध्येही प्रहार पक्षाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्र लढण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने पूर्वी अचलपूर आणि चांदुर बाजार नगरपालिकांमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती. आता त्या विजयाची पुनरावृत्ती करण्याबरोबरच नवीन ठिकाणी पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्याचा निर्धार पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. प्रहार सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांत अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार असून, पक्ष ‘तगड्या’ उमेदवारांसह मैदानात उतरणार आहे. यामुळे अमरावती जिल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रहार पक्षाकडून मोठी लढत पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button