राजापेठेत किन्नर गटांत रक्तरंजित संघर्ष
पोलिसांसमोरच तलवारी, लाठी-डंडे, मिरची पावडर आणि दगडांचा मारा

अमरावती/ 5 नोव्हेंबर – राजापेठ बसस्थानकाच्या मागे असलेल्या बजरंग टेकडी परिसरात आज सकाळी किन्नर समाजातील दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये झालेल्या संघर्षाने संपूर्ण परिसर हादरला. पोलिस कर्मचार्यांच्या उपस्थितीतच किन्नरांनी एकमेकांवर हल्ला चढवला. तलवारी, लाठी-डंडे, मिरची पावडर आणि दगडांचा मुक्त वापर झाला. काहींनी प्रतिस्पर्ध्यांचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळानंतर राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आज सकाळी सुमारे साडेदहा वाजता आम्रपाली किन्नर गटाच्या मठात पूर्णिमेची पूजा सुरू होती. त्याच वेळी साबनपुरा आणि अकबरनगर येथील दुसर्या गटातील किन्नर तिन्ही ऑटोमध्ये भरून बजरंग टेकडी परिसरात आले. त्यांनी आम्रपाली किन्नरच्या घरासमोर ढोल बडवायला सुरुवात केली. दीपावलीला पंधरा दिवस उलटून गेल्याने त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आम्रपाली गटाने तातडीने राजापेठ पोलिसांना माहिती दिली. दोन पोलिस कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले, परंतु त्याआधीच दोन्ही गट आमनेसामने आले होते.
थोड्याच वेळात गालिगाळ सुरू झाली आणि अचानक कुणीतरी मिरची पावडर उडवली. क्षणातच परिसरात धावपळ उडाली. काहींनी ऑटोमधून तलवार बाहेर काढली, तर काहींनी लाठी-डंड्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडले. काही किन्नरांनी कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिस कर्मचार्यांनी कसाबसा हस्तक्षेप करून गोंधळ शांत केला. घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे राजापेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आम्रपाली गटाने राजापेठ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तसेच त्यांनी शहर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन प्रतिस्पर्धी गटाविरुद्ध कारवाई करण्याची आणि स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली आहे.गेल्या काही काळापासून अमरावती शहरात किन्नर समाजात अनेक गट निर्माण झाले आहेत. प्रत्येक गटाने वेगवेगळ्या भागात आपले मठ उभारले असून शहरातील मांगण्याच्या हद्दीवरून वाद सुरू असतात. त्यातूनच वेळोवेळी असे हाणामारीचे प्रकार घडत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.राजापेठ पोलिस ठाण्याचे सूत्र म्हणाले, घटनेतील व्हिडिओ फुटेज तपासले जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील किन्नर गटांमधील वाढते संघर्ष पाहता पोलिस दल आता विशेष नजर ठेवणार असल्याची माहितीही देण्यात आली.




