कृषीमंत्री म्हणतात…‘ढेकळांचे पंचनामे करणार काय?’
माणिकराव कोकाटे पून्हा बरळले

-महिनाभरात दुसर्यांदा बळीराजाला दुखावलं!
नाशिक / 30 मे: काही दिवसापूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकर्यांचा अपमान केला होता, या घटनेला महिना पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा कृषिमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाला दुखावलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी सिन्नर येथे गेलेल्या कृषिमंत्र्यांनी शेतकर्यांच्या बांधावर केलेल्या या विधानामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल त्यांनी शेतकर्यांना केला. कोकाटेंनी केलेले हे विधान विरोधकांना मिळालेले आयते कोलीतच आहे. महिनाभरापूर्वी कोकाटे यांनी शेतकर्यांना ‘भिकारी’ म्हणत, कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते, असा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी त्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकाटेंच्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आज कोकाटेंनी केलेल्या नव्या वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या या विधानाचा विरोधक कसा समाचार घेणार हे लवकरच समजेल.
राज्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कांदा, भुईमूगाच्या शेंगा यांसारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नुकसान भरपाई मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकर्यांना कोकाटेंनी दिलासा देण्याऐवजी दुखावल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कृषीमंत्र्यांनी ही ‘मुक्ताफळे’उधळली आहेत.




