शेतकर्‍यांनो, आत्महत्या करू नका; दोन-चार मंत्र्यांना कापा

नागपुरात रविकांत तुपकरांचे आक्रमक भाषण

नागपूर /28 ऑक्टोबर : शेतकरी हे त्यांच्या स्वतःमुळे कर्जबाजारी झाले नाहीत तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. शेतकर्‍यांनो, आत्महत्या करू नका. आमदार नव्हे तर दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका असंही ते म्हणाले. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यावेळी आंदोलकांना संबोधित करताना तुपकरांनी राज्य सरकारवर टीका केली. सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही. राज्यात जातीचा मोर्चा निघाला तर सरकार आंदोलनाच्या ठिकाणी येतं. मग आमच्या मातीच्या मोर्चाला तुम्ही का येऊ शकत नाही? आम्ही तुमच्या दारात येणार नाही, तर तुम्हाला आमच्याकडे चर्चा करायला यावं लागेल. सरकारने निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्याला एक वर्ष झाले तरी त्यावर काहीच बोलत नाहीत. आम्ही काही भीक मागायला आलो नाही, तर कर्जमुक्ती ही आमची मागणी आहे. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे. केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात केली नसल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सोयाबीनची निर्यात केल्यास त्याला 8000 भाव मिळेल. कापूस आयातीपेक्षा कापूस निर्यात करा. आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालं नाही तर तुमच्या धोरणांमुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहे. तुम्ही कापूस, ऊस शेतकर्‍यांना लुटला आणि आम्ही कर्जबाजारी झालो. शेतकर्‍यांच्या पीकांना भाव मिळत नसल्याने मुलांची लग्नं होत नाहीत. हे एक मोठं संकट निर्माण झालं आहे. नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना हाणलं ना ते मंत्री देश सोडून पळून गेले. नागपूर नंतर पुढचा टप्पा मुंबईत ठेवा. त्या नालायकांना आपण बाहेर काढू. माझ्यावर 100 केसेस दाखल आहेत. पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये शेतकर्‍यांच्या छाती कमी पडणार नाहीत. आम्ही काही फक्त बोलबच्चन नाही. आम्ही जे बोलतो ते करतो. लोक म्हणतात की शेतकर्‍यांचे मजबूत संघटन होऊ शकत नाही. पण तुम्ही दाखवून दिलं की शेतकरीही एकत्र येऊ शकतात. इथून पुढे आत्महत्या करायच्या नाहीत. कितीही संकटं आली तरी जीवन संपवायचं नाही. बच्चू भाऊंनी सांगितलं की आमदाराला कापा. मी त्या पुढे जाऊन सांगतो की दोन-चार मंत्र्यांना कापा. पण आता मागे हटायचं नाही. मरायचं तर आजिबात नाही. युद्धामध्ये काही झालं तर नेत्याचा आदेश शिरसावंद्य असतो. त्यामुळे इथले नेते जो काही आदेश देतील, त्याची अंमलबजावणी करा. घरी फोन करून सांगा, कर्जमाफी केल्याशिवाय माघारी येणार नाही. त्यामुळे आता सरकार कसं चर्चेला येत नाही ते आपण पाहूच. शेतकर्‍यांची एकजुट झालेली वज्रमुठ सोडू नका. इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी, भगतसिंहांचा जन्म झाला. अण्णा हजारेंनी आंदोलन केलं म्हणून केजरीवाल दोन-तीन वेळा मुख्यमंत्री झाले. आता राज्यातील सरकार माजलं म्हणून इथले नेते जन्माला आले आहेत असं समजा.

संबंधित बातम्या

Back to top button