बच्चू कडूंची ट्रॅक्टर रॅली वर्धेत दाखल

सुकळी येथे कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था

वर्धा/27 ऑक्टोबर – माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ट्रॅक्टर रॅली काढली आहे. सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही रॅली आर्वी तालुक्यात दाखल झाली. मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी रॅली सुकळी (बाई) येथे पोहोचणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी दिली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेती उत्पादनाचे हमी दर, तसेच मच्छीमार, शेतमजूर, दिव्यांग आणि मेंढपाळ यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे महाएल्गार आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

अमरावती येथून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह बच्चू कडू रवाना झाले असून सायंकाळी ही रॅली आर्वीमध्ये दाखल झाली. ही यात्रा खरांगणा, वाढोणा, आंजी आणि सुकळी (बाई) या मार्गाने पुढे जाणार आहे. सुकळी येथे कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीच्या सर्व तयारीत प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे, शैलेश खोसे, प्रीतम कातखेडे, मंगेश मुडे, सुरज घायवट, अमोल आव्हाड, भूषण येलेकार, विवेक धोंगडे, शुभम भोयर, विवेक चौधरी आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय आहेत.मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी ही रॅली वर्धा येथील जुनापानी चौकात पोहोचेल आणि तेथून पवनार, सेलू, केळझर मार्गे नागपूरकडे रवाना होईल.

संबंधित बातम्या

Back to top button