आम्हाला काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता, पण…
काँग्रेस नेत्याच्या विधानावर संजय राउत यांचा हल्लाबोल

मुंबई/23 ऑक्टोबर – राज्यात कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून स्वबळाचा नारा देण्याची शक्यता असतानाच, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. तसेच, मुंबईवर काँग्रेसचा महापौर बसवायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी, 23 ऑक्टोबरला प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, “आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता, पण ते शक्य झाले नाही. आम्ही इंडिया आघाडी निर्माण केली कारण राहुल गांधींना पंतप्रधान करायचे होते. आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमचे मन फार मोठे आहे आणि राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. मुंबईच्या महापौरांचे काय घेऊन बसले, मुंबईची 27 महापालिका काँग्रेसच्या असोत, काही अडचण नाही.”
राऊतांनी सांगितले की, भाजपाच्या पैशाच्या भ्रष्ट राजकारणासमोर ऐक्याचे आव्हान उभे करणे ही आमची भूमिका आहे. महापौर मराठी असणे, मराठी मातीतला असणे याला ते प्राधान्य देतात. मुंबईवर गेल्या तीस वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर राहिला असून त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागते. अनेकदा त्यासाठी काँग्रेसचे सहकार्य घेतले गेले आहे, असेही त्यांनी नमूद केले. शिवसेना पक्षाचे म्हणणे आहे की मुंबईतील समस्त मराठी माणूस, महाराष्ट्रप्रेमी माणूस, मग मुसलमान, गुजराती, जैन, पारशी असोत, हे सर्व या वेळेला त्यांच्यासोबत आहेत. भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी केलेले विधान एका दिवसाच्या प्रसिद्धीचे वाक्य असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेसच्या मराठी नेतृत्वाने मुंबईवरील संकटाचा विचार करावा, असा सल्लाही राऊतांनी दिला.




