महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय मागे घ्या

अमरावतीतील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेला तीव्र विरोध

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

अमरावती /2 जुलै- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत अचानक संगणक आधारित पद्धत लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध अमरावतीत शेकडो विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शांततापूर्ण आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विद्यार्थ्यांनी राज्य सरकार आणि आयोगाला निवेदन सादर केले. मागील अनेक वर्षांपासून ओएमआर पद्धतीनुसार तयारी करणार्‍या ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर हा निर्णय म्हणजे मोठा अन्याय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संगणकाचे मर्यादित ज्ञान, तांत्रिक अडचणी, वीज आणि इंटरनेटचा अभाव यांसारख्या समस्यांमुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे कठीण आहे. परीक्षेच्या अगदी तोंडावर परीक्षा पद्धतीत बदल केल्याने अभ्यासाचे नुकसान होणार असून, यामुळे स्पर्धेत मोठी दरी निर्माण होईल, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून केवळ स्पर्धा परीक्षांमध्ये समान संधी आणि निष्पक्ष व्यवस्था मिळावी, या एकमेव उद्देशाने करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुयोग राजोनेकर, पंकजसिंह राजपूत, भरत खातरकर, चैतन्य मुठल, स्नेहा मेटकर आणि आदित्य मिसळ यांच्यासह मोठ्या संख्येने अमरावती जिल्ह्यातील एमपीएससी परीक्षार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने पूर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ओएमआर पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. संपूर्ण आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button