अमरावतीचे राजकमल उड्डाणपूल काम पुन्हा संभ्रमात

महारेलकडे सोपविले उड्डाणपुलाच्या बांधकामाचे महत्त्वाचे काम निर्मिती प्रक्रियेतील अनिश्चिततेने नागरिकांमध्ये वाढली चिंता

अमरावती /2 जुलै– शहराच्या हृदयस्थानी असलेल्या बहुप्रतिक्षित राजकमल रेल्वे उड्डाणपुलाचे भवितव्य आता पूर्णपणे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महारेलच्या निर्णयावर अवलंबून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्याची तयारी केली असतानाच, शासनाने अचानक ही योजना महारेलकडे सोपविली आहे. यामुळे या कामाबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून, उड्डाणपुलाची प्रतीक्षा करणार्‍या नागरिकांच्या पदरी पुन्हा निराशा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उड्डाणपुलाचे काम महारेलकडे सोपविल्याने, आता नवीन यंत्रणेला पुन्हा सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश राठोड यांनी माहिती दिली की, शासनाचे आदेश प्राप्त होताच आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया महारेलला हस्तांतरित करण्यात आली आहे. आता या पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया आणि पुढील सर्व निर्णय महारेल स्तरावरूनच घेतले जाणार आहेत. दरम्यान, या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच करून घ्यावे, जेणेकरून तांत्रिक मान्यता आणि प्रक्रियेत होणारा अनावश्यक विलंब टाळता येईल, अशी मागणी आ. संजय खोडके यांनी विधिमंडळात केली होती. मात्र, शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे या मागणीला सध्या तरी हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. महारेलकडे काम सोपविल्यानंतर आता कोणती नवीन प्रक्रिया राबविली जाणार आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, याबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून ये-जा करत असल्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, परंतु प्रशासकीय बदलांच्या खेळात हा प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button