दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषण अडीचपट वाढले

परिणाम रात्री 8 ते 10 या वेळेत जाणवला

* हवामान केंद्राचे अवलोकन

अमरावती /23 ऑक्टोबर – हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरून (AQI) एखाद्या शहराचे वायूप्रदूषण किती आहे हे ठरवले जाते. अमरावती शहराचा सरासरी एक्यूआय 125 असतो, परंतु दिवाळीच्या दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळे रात्री आठ ते दहा या वेळेत तो तब्बल अडीचपट वाढून 314 वर पोहोचला होता. ही बाब शास्त्रीयदृष्ट्या ‘व्हेरी पुअर’ या व्याख्येत मोडते. त्यामुळे त्या दोन तासांत आजारी नागरिकांना श्वास घेण्यासाठी काहीसा त्रास जाणवला असावा, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) म्हणणे आहे.

या वर्षीच्या दिवाळीच्या रात्री शहराच्या अनेक भागांत धुराचे लोट उठताना दिसले. हे लोट फटाके फोडल्यामुळे निर्माण झालेल्या धुराचे होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वायूप्रदूषणात बर्‍यापैकी वाढ झाली होती. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या हवामान केंद्राने या वायू प्रदूषणाची नेमकी मोजदाद केली आहे. दरम्यान, नागपूर येथील हवामान खात्याचे स्थानिक अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील या आकड्यांना दुजोरा दिला असून, मंगळवारच्या रात्री अमरावतीचे आकाश काही काळासाठी 301 ते 400 या दरम्यानच्या ‘व्हेरी पुअर’ व्याख्येत पोहोचले होते. शहराचा मुख्य परिसर असलेल्या अंबागेटच्या आतील जुने शहर, कॅम्प, विद्यापीठ रोड, वडाळी, श्रीकृष्ण पेठ, राजकमल चौक, साईनगर आणि गाडगेनगर या भागांमध्येही हीच आकडेवारी कायम होती, असे एमपीसीबीचे म्हणणे आहे. एरव्ही अमरावती शहराचा रोजचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा 101 ते 200 या ‘मॉडरेट’ व्याख्येत मोडणारा असतो. याची सरासरी मोजदाद 125 ते 130 इतकी असते.

तज्ज्ञांच्या मते, हवेतील धूलिकण आणि वाहनांमधून होणारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन यामुळे हवा प्रदूषित होते. मात्र, अमरावती शहराच्या काही भागांतील हरित पट्ट्यांमुळे हे प्रदूषण नियंत्रित केले जाते. त्यामुळे 6 ते 10 लाख लोकसंख्येच्या महानगरांपैकी अमरावती हे तुलनेने शुद्ध हवेचे महानगर म्हणून ओळखले जाते. दरम्यान, दिवाळीच्या दिवशी वाढलेल्या प्रदूषणामुळे काही वेळासाठी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक वेगळ्या व्याख्येत गेला होता. हवामान केंद्राने केलेल्या मोजणीनुसार अमरावती शहराचा त्या दिवशीचा एक्यूआय 125 होता, पण रात्री आठनंतर तो वाढला आणि दहाच्या पुढे पुन्हा सामान्य झाला. जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा एक्यूआय मात्र 69 ते 125 दरम्यान राहिला.

* हरित फटाके आणि पावसाचाही फायदा

यंदा दिवाळीत काही प्रमाणातझालेला हरित फटाक्यांचा वापरआणि ऐन लक्ष्मीपूजनाच्या काहीवेळ आधी दुपारी आलेला पाऊसयामुळे धूलिकण दाबले गेले. याचापरिणाम म्हणूनही दिवाळीतफटाक्यांचे प्रदूषण अधिक प्रमाणातजाणवले नाही. केवळ रात्री 8 ते 10या वेळेत फटाके फोडल्यानेप्रदूषणाची पातळी काहीशी वाढूनएक्यूआय 314 वर पोहोचला होता.

संबंधित बातम्या

Back to top button