मतदारयाद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार
निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांचा आरोप

* मतदारयाद्यांमधील घोळ दुरुस्त करा
* महाविकास आघाडी छेडणार आंदोलन
मुंबई/19 ऑक्टोबर – निवडणूक आयोगाने सत्ताधार्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवले आहेत, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. काही वेळापूर्वी मनसेच्या मेळाव्यात त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला की मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाही तोवर महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आयोजन झालेला नाही. राज ठाकरे म्हणाले की, आम्ही आणखी एक वर्ष थांबू, परंतु आधी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करा. त्याचबरोबर त्यांनी यावेळी घोषणा केली की निवडणूक आयोगाविरोधात आणि सरकारविरोधात आपला लढा कसा असेल याची माहिती आज दुपारी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतून दिली जाईल. यानुसार शिवसेना (उबाठा) भवन येथे सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि घोषणा केली की येत्या 1 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व विरोधी पक्ष विराट मोर्चा काढतील. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते सचिन सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि काम्रेड प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
* 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय विराट मोर्चा काढणार
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की निवडणूक आयोगाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात येत्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल, ज्यात जिल्ह्याजिल्ह्यातील व गावागावातील मतदानाचा अधिकार गमावलेले लोक सहभागी होतील; या मोर्चाद्वारे मतदारांची ताकद देशाच्या पंतप्रधानांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना व निवडणूक आयोगाला दाखवली जाईल आणि निवडणूक आयोगाला दणका देणे आवश्यक आहे. राऊत म्हणाले की आयोगाला व दिल्लीतल्या सत्ताधार्यांना सांगायचे आहे की इतका अन्याय होत असताना महाराष्ट्र शांत बसलेला नाही किंवा अजगरासारखा पडून राहिलेला नाही आणि त्यांचे आव्हान स्वीकारायची त्यांची तयारी आहे. खासदार राऊत यांनी पुढे सांगितले की मुंबईत काढल्या जाणार्या मोर्चाची वेळ व मार्ग लवकरच जाहीर केले जातील आणि मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते पुन्हा एकदा एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देतील.




