पावणेचार वर्षात राज्यात 679 वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू
अपघाताने 23 वाघांचा मृत्यू

चंद्रपूर /19 ऑक्टोबर : मागील पावणेचार वर्षांत राज्यात एकूण 679 वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात नैसर्गिक मृत्यू असला तरी अपघात, शिकार, विद्युत प्रवाह आणि सापळा लाऊन होणारे मृत्यू हीही मोठी कारणे आहेत, जे वनविभागासमोर मोठे आव्हान ठरत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दाखल केलेल्या अधिकारातून मिळालेल्या अधिकृत माहितीवरून समोर आले आहे की, 2022 ते २४ सप्टेंबर 2025 दरम्यान 679 प्राण्यांचा मृत्यू नोंदवला गेला असून त्यात 142 वाघांचा मृत्यू झाला आहे, ज्यापैकी 84 मृत्यू नैसर्गिक आहेत. शिकारी प्रामुख्याने वाघांचे शरीर आणि नखांसाठी त्यांना लक्ष्य करतात, तसेच काही वेळा पशुधनाचे हल्ले रोखण्यासाठीही वाघांना मारले जाते, असे अभ्यासक मानतात. याच कालावधीत 537 बिबट्यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 248 नैसर्गिक मृत्यू आहेत. अपघातांमुळे 185 बिबट्यांचा मृत्यू झाला, तर 11 बिबट्यांची शिकार झाली आणि 11 बिबट्यांना वीजेचा धक्का बसल्याचे नोंदले आहे. याशिवाय 76 बिबट्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे किंवा त्यांना अनिश्चित म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.




