‘समृद्धी’वर भीषण अपघात, दोन विदेशी पर्यटक ठार
वाशिम जिल्ह्यातील घटना

अकोला /18 ऑक्टोबर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघातात दोन विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला. वाशीम जिल्ह्यातील डव्हा-जऊळका दरम्यान, चॅनल क्रमांक 232 वर ही दुर्घटना घडली. म्यानमार देशातील हे पर्यटक पर्यटनासाठी भारतात आले होते. ते मुंबईहून जगन्नाथपुरी दर्शनासाठी मोटार (क्रमांक एमएच 01 बीबी 1215) घेऊन निघाले होते. मात्र, समृद्धी महामार्गावर डव्हा ते जऊळका दरम्यान वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या दुभाजकावर आदळली आणि भीषण अपघात झाला.
अपघात इतका गंभीर होता की मोटारीचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात मिन ऑग (वय 33) आणि मिन चित ऑग (वय 13) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून सर्व जखमींना तातडीने वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असा सुमारे 701 किलोमीटर लांबीचा असून, तो दहा जिल्ह्यांमधील 390 गावांना जोडतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेला हा महामार्ग अवघ्या आठ तासांत मुंबई ते नागपूर प्रवास करण्यास सक्षम आहे. तथापि, नियमितपणे घडणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानवी चुका आणि इतर तांत्रिक कारणे अपघातांसाठी जबाबदार ठरत असून, विविध उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.




