काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारावेत कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती

शहरात खोटे वृत्त पसरवून दिशाभुल करु नका

* नेहरू मैदानाचा वारसा जपण्यास भाजप सक्रिय
* शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा काँग्रेसवर निशाणा

अमरावती/ 15 ऑक्टोंबर – काँग्रेस पक्ष अमरावती शहर जिल्ह्यात खोटे वृत्त पसरवण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी नागरीकांची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन शहर जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. त्यांनी काँग्रेस नेत्यांनी भाजपवर आरोप करण्यापूर्वी त्यांच्या स्वतःच्या नेत्यांना प्रश्न विचारावेत, असे सांगत सडेतोड उत्तर दिले. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते किरणताई महाले, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, बादल कुलकर्णी, ललित समदुरकर, सचिन रासने, राधा कुरील आणि राजू कुरील आदी उपस्थित होते. डॉ. धांडे म्हणाले की, भाजप शहरातील प्रमुख मैदाने  शैक्षणिक, दसरा, नेहरू आणि सायन्स कोर्स यांचा वारसा जतन करण्यासाठी कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चार मैदानांसह किल्ल्यासारख्या सर्व वारसा स्थळांचे जतन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहरू मैदानावर महापालिका कार्यालय बांधण्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून काँग्रेस नेत्यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. मित्रपक्षाचे नाव न घेता, भाजप नेत्यांनी त्यांना स्वतःचे खुलासे करण्याचे आवाहन केले असून भाजपला या विषयावर त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही. डॉ. धांडे यांनी आरोप केला की, महापालिकेतील कचरा वाहतुकीचे कंत्राट काँग्रेस नेत्यांच्या जवळच्या लोकांनी वर्षानुवर्षे घेतले आहे आणि आजही काँग्रेसला फक्त कचरा कंत्राटांमध्येच रस आहे. भाजपने प्रशासनाकडे या कंत्राटदारांवर दंड आणि काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याची वारंवार मागणी केली आहे. भाजप महानगरपालिकेत सत्तेत असताना काँग्रेस नेत्यांचे कंत्राट का रद्द केले गेले नाही, असे विचारले असता धांडे म्हणाले की हा करार 15 वर्षांसाठी होता आणि भाजपच्या काळात विभागणीनुसार कंत्राटे देण्यात आली होती. प्रत्येक वेळी भाजपने कारवाईची मागणी केली, असे ते म्हणाले. काही काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेबाबत आक्षेप घेऊन त्यांनी जोरदार टीका केली.

संबंधित बातम्या

Back to top button