किती आत्महत्या झाल्यावर सरकार शेतकर्यांना कर्जमाफी देणार?
खा.अमर काळे यांची सरकारवर जोरदार टीका

वर्धा /12 ऑक्टोबर : एक वर्ष होऊन गेले तरी शेतकर्यांची कर्जमाफी अद्याप झाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे यांनी महाराष्ट्र शासनावर केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “राज्यात अजून किती शेतकर्यांच्या आत्महत्यांनंतर शासन कर्जमाफी करेल?” राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकर्यांना मदत द्यावी आणि संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली. मात्र, राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज अपुरे असल्याचे आणि कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. अमर काळे यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “शेतकर्यांसाठी दिलेले पॅकेज तोकडी मदत आहे; पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. डोक्यावर असलेले कर्ज फेडीच्या चिंतेत शेतकरी आत्महत्या करत आहे, पण सरकार अजून झोपेत आहे.” त्यांनी सुचवले की, कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी हे पैसे शेतकर्यांच्या पुनर्वसनासाठी वापरणे गरजेचे आहे. “कुंभमेळ्याचे पॅकेज कमी करा, शेतकर्याला दिलासा द्या,” असा थेट सल्ला त्यांनी फडणवीस सरकारला दिला.



