एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई /7 ऑक्टोबर : एसटी महामंडळाच्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगार संघटना यांच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. मंत्री सरनाईक म्हणाले की, कामगारांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि अन्य थकीत भत्ते तसेच दिवाळी सणासाठी अग्रिम देणे याबाबत शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. सन 2018 पासून कर्मचार्यांची उपरोक्त स्वरूपाची आर्थिक देणी प्रलंबित असून त्यासाठी सुमारे 4,400 कोटी रुपये लागणार आहेत.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, प्रत्येक वेळेस शासनाकडे निधी मागणे योग्य नाही; त्यासाठी एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. जाहिरातीच्या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून, बस आगारात असलेल्या पटेराळे पंपांद्वारे सध्या केवळ महामंडळाच्या बससाठी इंधन पुरवठा केला जात आहे. भविष्यात हे पंप व्यावसायिक स्वरूपात सुरू केले जातील, ज्यामुळे वार्षिक 200 ते 250 कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे वर्षाला 500–600 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न वाढ होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच, एसटी महामंडळ स्वतःच प्रवासी सेवा विकसित करेल, ज्यामध्ये टॅक्सी, रिक्षा आणि ई- बाईक सेवाही समाविष्ट केली जातील.




