आघाडीत गेल्यापासून उद्धव ठाकरेंना मदतीचा विसर
आ. संजय गायकवाड यांची टीका

* ‘सीएम फंड’ ला दोन प्लॉट विकून 25 लाखांची मदत
बुलढाणा / 30 सप्टेंबर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना महाराष्ट्र संकटात आल्यावर मदतीसाठी धावून जायची. मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या वळचणीला गेले आणि अन आघाडीत गेल्यापासून मदतीची ही परंपरा बंद झाली आहे; किंबहुना त्यांना याचा विसरच पडला आहे. विरोधकांचेही असेच असून त्यांनी सरकारवर नुसती टीका न करता शेतकर्यांना मदत करावी; काँग्रेसनेही मदतीचा हात द्यावा. विरोधकांनी सरकारला फुकटचे सल्ले देणे बंद करावे, असे टिकास्त्र शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी सोडले.
मलकापूर मार्गावरील आपल्या मातोश्री संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांचे योगदान देत असल्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी बुलढाण्यातील आपले दोन प्लॉट विकून ही रक्कम उभारल्याचा दावा केला. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी खरेदी-विक्री खत आणि 25 लाखांची रक्कमही दाखवली.
आज मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी दुपारी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या संकटात सापडले आहेत. अर्ध्या अधिक राज्यात भीषण ओल्या दुष्काळाचे संकट आहे; मागील अनेक दशकात पडला नाही तेवढा पाऊस यंदा पडला. यात शेतकर्याची नुसतीच पिके वाहून गेली नाही तर हजारो एकर जमीन खरडून गेली आहे, हे नुकसान कधीच न भरून निघणारे आहे. एवढी माती आणणार कुठून, असा उद्विग्न सवाल करून अनेक नेते पाहणीचे नुसतेच देखावे करीत आहेत. आम्ही मदत केली तर प्रसिद्धी करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला. राज्याच्या आर्थिक संकटासाठी लाडकी बहीण योजना काही अंशी जबाबदार असल्याची कबुली आमदारांनी दिली.
यावेळी युवासेनेचे मृत्युंजय गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, विजय अंभोरे, अजय बिल्लारी, श्रीकृष्ण शिंदे, गणेशसिंग राजपूत, अनुजा सावळे आणि जिजा राठोड उपस्थित होते.




