सुनेत्रा पवारांच्या निवडणूक आयोगाच्या पत्राने तटकरे-पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

मुंबई/25 मार्च – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर पकड मिळवण्यासाठी धडपड सुरू असतानाच, नवनियुक्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक अत्यंत महत्त्वाचे पत्र पाठवले आहे. या पत्रामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची अधिकृत माहिती दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, 28 जानेवारीनंतर पक्षाच्या वतीने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरला जाऊ नये. इथून पुढे मी जो पत्रव्यवहार करेन, तोच अधिकृत आणि ग्राह्य धरला जावा. या एका मागणीमुळे पक्षातील निर्णय प्रक्रियेवर आतापर्यंत प्रभाव असलेल्या तटकरे आणि पटेल यांच्या अधिकारांवर थेट गदा आल्याचे म्हटले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीचे निमंत्रण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आले नव्हते. प्रदेशाध्यक्षांनाच डावलून बैठक होणे आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवारांचे हे पत्र समोर येणे, यावरून पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.




