महात्मा गांधींना शरण जाणे हा संघाचा वैचारिक पराभव
काँग्रेस प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

* संविधान सत्याग्रह पदयात्रेचा सावंगीत मुक्काम
नागपूर/ 30 सप्टेंबर – महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली, तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीस महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. परंतु द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला हे सर्वांना माहित आहे, पण बदनामी महात्मा गांधींची करण्यात आली. मात्र आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण गेला, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पुढे म्हटले की, खोटे बोलून आज भाजपा सत्तेत आली आहे, पण महात्मा गांधी नावाचा संत भाजपा व आरएसएसच्या मानगुटीवर बसलेला आहे. संघाच्या 100 व्या वर्षी सुवर्णयोग आलेला असून भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार संघाने स्विकारावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही. यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भारतात पाकिस्तान आशिया चषक भारताने पहिल्यांदाच जिंकलेला नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातही राजकारण करण्याची संधी सोडली नाही. हवा असो, पाणी असो किंवा खेळ असो, नरेंद्र मोदी ध्रुवीकरण करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतात, हे त्यांच्या एक्सवरील पोस्टवरून स्पष्ट होते. भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण देशाची एक विशिष्ट प्रतिष्ठा असते ती मात्र नरेंद्र मोदी जपत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.
नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पदयात्रा पुन्हा सुरु झाली. दुपारी सावंगी येथे विश्रांती घेण्यात आली आणि रात्रीचा मुक्काम खडकी येथे आहे. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोयर, सरचिटणीस संदेश सिंघलकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.




