धारणी आदिवासी विकास प्रकल्पात महाघोटाळा

90 लाखाचे बनावट देयक वितरीत करण्याचा प्रकार

लेखापाल, भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिकाचा प्रताप

धारणी / 4 फेब्रुवारी मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या ताटातील पोषण पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उघडकीस आला आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांन अंडी पुरवठा केल्याचा केवळ बनाव रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे 90 लाख रुपयांची देयके लाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या महाघोटाळ्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी कार्यालयातून महत्त्वाच्या नस्त्यांची चोरी करण्यात आली असून, यामध्ये भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांचे मोठे साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार होऊन दीड वर्ष उलटले तरी तपासाची चक्रे फिरलेली नाहीत, त्यामुळे संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील स्वामी समर्थ पुरवठादाराने मेळघाटातील आश्रमशाळांमध्ये अंडी पुरवठाच केला नाही, तरीही लेखापाल, भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक यांनी संगनमत करून देयके मंजूर केली. या प्रकरणाची माहिती उघड होऊ लागताच धारणी प्रकल्प कार्यालयातील खिडकीचे गज कापून अंडी आणि केळी पुरवठ्याच्या मूळ नस्त्या, पोच पावती व इतर हिशोबाच्या धारिका चोरीला गेल्याची तक्रार 6 जून 2024 रोजी नोंदवण्यात आली. सीसीटीव्ही चित्रीकरणात तोंडाला पांढरा कपडा बांधलेला चोरटा दिसत असूनही, पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. केळी पुरवठादाराचे 20 लाख रुपये रखडल्याने हे 90 लाखांचे बिंग फुटले. मेळघाटातील गरीब मुलांच्या वाट्याचा निधी असा लंपास होत असताना वरिष्ठ प्रशासन गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन दोषी कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा आदिवासी विकास आयुक्तांच्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडले जाईल, असा पवित्रा तक्रारदारांनी घेतला आहे.
तपासाच्या नावाखाली केवळ धूळफेक-केवळ बनावट कागदपत्रांवर 90 लाखांचा अपहार झाला असतानाही दीड वर्षात आरोपींना अटक झालेली नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय कार्यालयात घरफोडी करून नस्त्या लंपास केल्या जातात, हे प्रशासनाचे अपयश आहे. गरीब आदिवासी शेतकर्‍यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे काळाची गरज आहे.

संबंधित बातम्या

Back to top button