जलयुक्त शिवारच्या कामांचे ऑडिट
दोन मोठ्या संस्थांकडे सोपविली जबाबदारी

* कामाच्या गुणवत्तेची होणार प्रत्यक्ष तपासणी
अमरावती / 4 फेब्रुवारी : जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या ’जलयुक्त शिवार अभियान 2.0’ अंतर्गत झालेल्या जलसंधारण कामांची पारदर्शकता आणि गुणवत्ता तपासण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन नामांकित अभियांत्रिकी संस्थांमार्फत या कामांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण आणि तांत्रिक मूल्यांकन तातडीने सुरू करण्यात आले असून, यामुळे कामात हलगर्जी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. अमरावती जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी विविध जलसंधारण कामे हाती घेतली आहेत. या कामांमध्ये नेमकी किती पारदर्शकता आहे आणि त्याचा भूजल पातळीवर काय परिणाम झाला, हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीने ’सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती’ आणि ’प्राध्यापक राम मेघे तंत्रज्ञान व संशोधन संस्था, बडनेरा’ या दोन तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्थांचे तांत्रिक पथक आता जिल्ह्यातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन बारकाईने पाहणी करत आहेत. उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मूल्यमापनात केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष कामाचा दर्जा, विहीर पुनर्भरण, शेततळे, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण अशा सर्व कामांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये गाळाचा उपसा, समतल चर, बंधारे आणि नदी पुनरुज्जीवनाच्या कामांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित गाव खरोखर ’जल परिपूर्ण’ झाले आहे का, याचा सविस्तर अहवाल या संस्था शासनाला सादर करणार आहेत. कामापूर्वीची आणि कामानंतरची भूजल स्थिती काय आहे, याचाही शास्त्रीय अभ्यास यात केला जाणार असल्याने, या अभियानाचा खरा लाभ जनतेला किती झाला हे स्पष्ट होणार आहे.




