अमरावतीत 214 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्जसह आरोपीला ठोकल्या बेड्या
पाटीपुर्यात शहर गुन्हे शाखेची कारवाई

सराईत तस्कराला गाडीसह अटक
अमरावती /23 जुलै – स्थानिक शहरात ड्रग्जची गुपचूप विक्री करणार्या एका सराईत तस्कराला नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटीपुरा भागातून गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईत आरोपीकडून तब्बल 50 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात 42 लाख 80 हजार रुपये किमतीचे 214 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, 8 लाख रुपयांची मारुती स्विफ्ट गाडी आणि 3 मोबाईल फोनचा समावेश आहे. शहरात तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणार्या या मोठ्या तस्कराला बेड्या ठोकल्यामुळे अमरावती पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून पक्की बातमी मिळाली होती. पाटीपुरा भागातील एक जुना गुन्हेगार स्वतःच्या लाल रंगाच्या मारुती स्विफ्ट गाडीने मेफेड्रोन म्हणजेच एम.डी. नावाचा पांढरा अमली पदार्थ घेऊन ताजनगर परिसरात विकायला येणार होता. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी पाटीपुरा परिसरात दबा धरून सापळा रचला. संशयित गाडी दिसताच पोलिसांनी तिला घेराव घालून ताब्यात घेतले. गाडीत बसलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे झिपलॉक प्लास्टिकच्या पाऊचमध्ये पांढर्या व भुरकट रंगाची 214 ग्रॅम एम.डी. पावडर मिळून आली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सईद खान शरीफ खान, वय 41 वर्षे, राहणार पाटीपुरा, अमरावती असे आहे. हा अमली पदार्थ विक्रीसाठीच आणल्याची कबुली आरोपीने दिल्याने पोलिसांनी सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला. याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8(क), 21(क), 22(क) आणि 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज तस्करांचे धाबे दानाणले आहेत. पोलीस पथकाने आरोपीकडून एक झिपलॉक पाऊचमधील 214 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, एमएच 40 सीए 2191 क्रमांकाची लाल स्विफ्ट कार, 15 हजार रुपयांचा व्हिव्हो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, 2 हजार रुपयांचा जिओ भारत निळा की-पॅड मोबाईल आणि 2 हजार रुपयांचा जिओ भारत काळा की-पॅड मोबाईल असा एकूण 50 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बाप रे! शहरात 50 लाखांचे ड्रग्ज-अमरावती शहरातील पाटीपुरा परिसरात गुन्हे शाखेने छापा मारून सराईत तस्कर सईद खान शरीफ खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 42 लाख 80 हजार रुपयांचे 214 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, 8 लाखांची स्विफ्ट कार आणि 3 मोबाईल असा एकूण 50 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांत गुन्हा दाखल झाला.




