हवामानात बदल: सर्दी, खोकला, तापाच्याही रुग्णात वाढ
डेंग्यू-चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या 156 पार

दवाखान्यांमध्ये गर्दी अन नागरिकांमध्ये धावपळ
अमरावती /23 जुलै- शहरात पावसाळ्याचे दिवस सुरू होताच डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया या धोकादायक आजारांनी आपले डोके वर काढले असून मागील 3 महिन्यांत शहरासह परिसरात डेंग्यूचे 113 आणि चिकनगुनियाचे 33 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातून आणि गावोगावकडून उपचारासाठी येणार्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेची कसोटी लागत असून जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्ण उपचाराधीन आहेत.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. केवळ 20 दिवसांच्या कालावधीत सत्तेचाळीस रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून त्यातही डेंग्यूचे 33 रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी नागरिकांनी अजिबात घबराट बाळगू नये असे आवाहन केले आहे. त्यांच्या मते सध्या अमरावती शहरात राहणार्या कोणत्याही नागरिकाला डेंग्यू झालेला नाही तर जे रुग्ण उपचारासाठी येत आहेत ते सर्व शहरातील नसून आसपासच्या ग्रामीण भागातून आणि इतर ठिकाणांहून आलेले आहेत. शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण नाही असा दावा आरोग्य विभागाने केला असला तरी ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा फैलाव वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील तीन महिन्यांचा लेखाजोखा पाहिला तर मे महिन्यात डेंग्यूचे 34 आणि चिकनगुनियाचे 13, जून महिन्यात डेंग्यूचे 44 आणि चिकनगुनियाचे 14 तर जुलै महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे 33 आणि चिकनगुनियाचे 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय मलेरियाचे 24 रुग्ण सुद्धा सापडल्याने आरोग्य विभागाने तातडीने कंबर कसली आहे. सध्या बहुतांश रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले असून मोजकेच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्दी, घसादुखी, खोकला, ताप आणि हातपाय दुखणे यांसारखी लक्षणे घेऊन येणार्या रुग्णांची संख्या सतत वाढू लागली असून अशा प्रत्येक रुग्णाची डेंग्यू आणि चिकनगुनिया संदर्भात कसून तपासणी केली जात आहे. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने गावोगावी पाहणी मोहीम तीव्र केली आहे. ग्रामीण भागात आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत आणि लोकांना आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. ज्या भागातून रुग्ण जास्त प्रमाणात येत आहेत त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असली तरी नागरिकांनी देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून घरात किंवा परिसरामध्ये पाणी साचू देऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.




