कर्ज व नापिकीला कंटाळून; युवा शेतकर्याची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या

वरुड । 28 सप्टेंबर – कर्ज व नापिकीला कंटाळून तालुक्यातील एकल विहीर येथील 42 वर्षीय शेतकर्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव सिद्धार्थ महादेवराव धोके असून, वाढत असलेला कर्जाचा डोंगर आणि सततच्या शेतीतील नुकसानामुळे त्याने गावाजवळील ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीत उडी मारली. सिद्धार्थने उडी मारल्याचे कळताच गावकर्यांनी त्याचा मृतदेह विहिरीत शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरुवातीला तो सापडला नाही; अखेर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. याबाबत गावातील पोलीसपाटील प्रमोद ढोके यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटना स्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. सिद्धार्थच्या मागे आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा आप्त परिवार आहे. घरातील एकमेव कमविता पुरुष असल्यामुळे त्याच्या आत्महत्येमुळे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसलेला आहे.




