अपक्ष उमेदवार प्रशांत महल्लेंची माघार

काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुखांना पाठींबा

पक्ष नेतृत्वाच्या आदेशानंतर महल्लेंची भूमिका

अमरावती /4 जून- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक नाट्यमय वळण पाहायला मिळाले. काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत महल्ले यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून निवडणुकीची चुरस आता अधिकच वाढली आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अमरावती महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत महल्ले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती, असे महल्ले यांनी सांगितले. मात्र, पक्षाने त्यांच्याऐवजी दुसर्‍या उमेदवाराला संधी दिल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रशांत महल्ले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, आपण काँग्रेसचे कट्टर सैनिक आहोत. पक्ष नेतृत्वाचा निर्णय शिरसावंद्य मानून आपण माघार घेतली असून, आता पूर्ण ताकदीने काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी काम करणार आहोत. महल्ले यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असले तरी, राजकीय वर्तुळात यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अपक्ष उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या माघारीमुळे निवडणुकीचा निकाल नक्की कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय निष्ठा आणि शिस्तबद्ध निर्णय-प्रशांत महल्ले यांनी पक्षांतर्गत नाराजी दूर सारत दाखवलेली निष्ठा कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार माघार घेत एकजूट दाखवल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षहित महत्त्वाचे मानल्याने महल्ले यांनी राजकीय परिपक्वता जपली आहे. ही माघार निवडणुकीत गेम चेंजर ठरेल असे आता राजकीय विश्लेषक मानत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button