पंचनाम्यासाठी ड्रोन व मोबाईल फोटोंना मान्यता
निकष बाजूला ठेऊन शेतकर्यांना सरसकट मदत देणार

* मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकर्यांच्या बांधावर
* अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदतीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई/24 सप्टेंबर – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर येथे केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोठी घोषणा केली की, कोणी मोबाइलवर फोटो काढून दिला तरी तो मान्य करतात, ड्रोनचा पंचनामाही स्वीकारला जाईल, फक्त सरकारी नोंद असली पाहिजे. यंत्रणेने लवचिक राहावे आणि जास्तीत जास्त मदत करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दिवाळीपूर्वीच मदत देण्याचे आश्वासन देत त्यांनी सांगितले की, एनडीआरएफचे नियम केंद्र सरकारने बदलले असून तातडीची मदत देणे आवश्यक आहे. पंचनामे येताच मदत दिली जाईल; एका तालुका किंवा गावाचे आले तरी लगेच मदत केली जाते. आतापर्यंत 2200 कोटी रुपये मदतीसाठी दिलेले आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि म्हटले की, ‘घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे.’ विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही, हे पहिले सरकार आहे ज्यांनी पाहणीपूर्वीच 2200 कोटी रुपये शेतकर्यांच्या मदतीसाठी जाहीर केले. फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, त्यांच्या काळात आपत्ती आल्यावर त्यांनी काय केले होते, तर आपण जेवढे शक्य आहे ते शेतकर्यांसाठी करत आहोत आणि पुढेही करत राहू. या वेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.




