उघड्यावर जुगार खेळणार्या सहा जणांना अटक
चांदुर रेल्वे पोलिसांची कारवाई

-लाखोंचा मुद्देमाल जप्त
अमरावती / 27 जुलै : चांदुर रेल्वे शहरातील डांगरीपुरा भागात उघड्यावर हार-जीतचा जुगार खेळणार्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत 2.59 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी आणि तासपत्ते यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदुर रेल्वे येथील डांगरीपुरा भागात मेश्राम यांच्या घरा समोर, लाईटच्या उजेडात सार्वजनिक जागेत काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आरोपी दिलीप संतोषराव मानकर (36), निलेश महादेव धणे (36), आकाश हरिदास मेश्राम (32), कार्तिक दिलीप जरेले (23), विलास अशोकराव लामकासे (38), राजीक अहमद अब्दुल रफिक यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून 21 हजार 200 रुपये रोख, 6 मोबाईल फोन (अंदाजे किंमत 53,000), 52 पत्त्यांचा संच याशिवाय घटनास्थळावरून 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकींमध्ये हिरो स्प्लेंडर एमएच 27 डीके 9815, विनाक्रमांकाची हिरो स्प्लेंडर तसंच हिरो पॅशन प्रो एमएच 27 बीएन 1393 जप्त करण्यात आली आहे.
परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच आम्ही छापा टाकला. छापा पडताच काही काही जुगार्यांनी पळ काढला असला तरी त्यांना लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय आखरे यांनी दिली. जुगार खेळणे हा गुन्हा आहे. तसंच जुगारामुळे अनेकांचं जीवन तसंच कुटुंबं उद्ध्वस्त होते. त्यामुळे आपल्या चांगल्यासाठी जुगाराच्या नादाला लागू नये असं आवाहन यानिमित्तानं पोलिसांनी केलं आहे.




